जिल्हाधिकारी डॉ. भोसले लागले कामाला, पंचनाम्यापासून केला श्रीगणेशा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

कोविडचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण गेल्या सहा महिन्यांत कमी होत आहे. "माझे कुटूंब-माझी जबाबदारी' व कोरोनावर येणारी लस, याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पूर्वतयारी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामांचे नियोजन करण्यात येईल.

नगर ः अति पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या स्थानिक स्तरावरील अडचणी समजून घेऊ. शासकीय नियमांना बगल न देता, तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असे अचूक पंचनामे करण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येईल. प्रसंगी राज्य सरकारची विशेष परवानगी घेऊन पंचनामे करू, अशी ग्वाही नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. 

डॉ. भोसले यांनी आज मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ""अतिवृष्टीमुळे चार तालुक्‍यांत व 10 मंडलांत कापूस, सोयाबीन, तूर, मका व भूईमूगाचे नुकसान झाले आहे. पंचनामे नियमित होत नसल्याची माहिती मिळाली. हे पंचनामे योग्य व नियमित होण्यासाठी महसूल, कृषी व जिल्हा परिषदेच्या टीमला सूचना देण्यात येतील. शेतात जाणे शक्‍य नाही, तेथे आधुनिक तंत्रज्ञानानुसार नजरअंदाजे, पीकपाहणी पेरा अहवालानुसार पंचनामे करण्याचा विचार आहे. उद्या (गुरुवारी) पालकमंत्र्यांचा जिल्हा दौरा आहे. त्यावेळी मीही जिल्ह्यातील पावसामुळे शेतीची पाहणी करील.'' 

नगर जिल्ह्यात पूर्वी 2014मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्याची माहिती आहे. येथे जिल्हाधिकारी म्हणून येण्यापूर्वी मी पुणे विभागीय कार्यालयात सहायक आयुक्‍त होतो. त्याआधी सोलापूरला जिल्हाधिकारी होतो. सोलापूरप्रमाणेच नगर जिल्ह्याची भौगोलिक स्थिती व इतर स्थानिक प्रश्‍न आहेत. येथील प्रश्‍नांची मला जाण आहे. जनतेच्या हितासाठी जे शक्‍य आहे, ते करण्याचा संकल्प केला असल्याचे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. 

कोविडचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण गेल्या सहा महिन्यांत कमी होत आहे. "माझे कुटूंब-माझी जबाबदारी' व कोरोनावर येणारी लस, याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पूर्वतयारी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामांचे नियोजन करण्यात येईल. गुटखा प्रकरणाबाबत जिल्हा पोलिस प्रशासन व राज्य उत्पादनशुल्क विभागाशी चर्चा करून कारवाई करण्यात येईल, असे डॉ. भोसले म्हणाले. 
 

"बुके' नको "बूक' द्या 
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा विविध संघटनांतर्फे बुके देऊन सत्कार करण्यात येऊ लागला. त्यावेळी डॉ. भोसले यांनी "मला बुके नको, तर बूक द्या' असे आवाहन केले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector Dr. Bhosale started the work