
पारनेर तालुक्यात जिल्हा परिषद मार्फत कृषी व बांधकाम समितीच्या माध्यमातून विविध योजनेतुन कृषी योजना, रस्ता, पुल यासह अन्य विकासकामांसाठी भरीव निधी सभापती काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून तालुक्यात आला.
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्यात जिल्हा परिषद मार्फत कृषी व बांधकाम समितीच्या माध्यमातून विविध योजनेतुन कृषी योजना, रस्ता, पुल यासह अन्य विकासकामांसाठी भरीव निधी सभापती काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून तालुक्यात आला, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांनी केले.
देसवडे (ता. पारनेर) काळेवाडी ते बोरमळी या घाट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ भोसले यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. सभापती काशिनाथ दाते, उपसरपंच बबन शिंदे, भाऊसाहेब टेकुडे, शिवाजी दाते, प्रा. किशोर टेकुडे, संपत तोडकर, शिवाजी गुंड, बबन गुंड उपस्थित होते.
दाते म्हणाले, काळेवाडी येथील ग्रामस्थांची हा घाट रस्ता करण्याची मागणी केली होती. त्यानुसार हा रस्ता पाहिल्यानंतर हा रस्ता डोंगरपोटांनी खाली बोरमळी येथे टेकडवाडीला जाणाऱ्या डांबरी रस्त्यास जोडणे आवश्यक होता. येथील शेतकऱ्यांच्या पाईपलाईन नदीवरून वरती घाटाने गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना शेतीकामासाठी सारखे खाली घाटाने उतरावे लागत होते. अतिशय खडतर घाटाने महिला व लहान मुले खाली उतरतात. हे पाहून जिल्हा परिषदेच्या निधीची तरतूद करून हा रस्ता करून देण्याचे ठरवले व आज प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली.
संपादन : अशोक मुरुमकर