
बॅंकेच्या मुख्य शाखेसह अन्य शाखांतील संशयास्पद व्यवहारातून अडीच कोटींचा अपहार झाल्याचे म्हटले जाते. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिल्यानंतरही बॅंकेकडून कोणी फिर्यादी होत नाही.
नगर ः नगर अर्बन मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेतील अडीच कोटींच्या अपहारप्रकरणाच्या तक्रारीची तपासणी केली असता, प्रथमदर्शनी हा गुन्ह्याचा प्रकार दिसतो. त्यामुळे याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देऊ शकता, असे पत्र कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी नगर अर्बन बॅंकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांना दिले आहे.
बॅंकेच्या मुख्य शाखेसह अन्य शाखांतील संशयास्पद व्यवहारातून अडीच कोटींचा अपहार झाल्याचे म्हटले जाते. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिल्यानंतरही बॅंकेकडून कोणी फिर्यादी होत नाही. त्यामुळे हा गुन्हा दाखल होत नसल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी आता बॅंकेच्या प्रशासकांनाच पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखविल्याने ते प्रतिसाद देतात की नाही, याबाबत कुतूहल व्यक्त होत आहे.
पोलिस निरीक्षक मानगावकर यांनी प्रशासक मिश्रा यांना 10 डिसेंबरला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की 11 सप्टेंबरला बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे, मुख्य व्यवस्थापक सतीशकुमार रोकडे, प्रमुख व्यवस्थापक महादेव साळवे व मुख्य शाखाधिकारी मारुती औटी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज दिला.
बॅंकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनीही अडीच कोटी रुपयांच्या अपहाराबाबत तक्रार केली आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष, संचालक, अधिकारी व कर्जदारांनी कट रचून, संगनमताने खोटी कागदपत्रे तयार करून अडीच कोटींचा अपहार केला. ठेवीदार, सभासदांची फसवणूक केली. प्रशासकांच्या आदेशान्वये चौकशी अधिकारी ऍड. डी. व्ही. चंगेडे यांनी चौकशी करून 29 जूनला प्रशासकांना अहवाल दिला. त्याद्वारेही हा अपहार झाल्याचे स्पष्ट होत असल्याने, गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केली आहे.
याबाबत प्रशासक मिश्रा अथवा प्राधिकृत चौघांपैकी कोणीही कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद द्यावी, असे पत्रात पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अहमदनगर