टाळेबंदीबाबत विरोधी सूर; व्यापारी मात्र ठाम, नागरिकांमध्ये संभ्रम 

विलास कुलकर्णी
Wednesday, 9 September 2020

राहुरी तालुक्‍यात कोरोना संक्रमणाचा वेग गेल्या आठ दिवसांत दुपटीवर पोहोचला.

राहुरी (अहमदनगर) : तालुक्‍यात कोरोना संक्रमणाचा वेग गेल्या आठ दिवसांत दुपटीवर पोहोचला. केंद्र व राज्य सरकारने यापुढे टाळेबंदी जनतेवर सोपवली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी प्रशासन व व्यापाऱ्यांच्या बैठकीत तालुक्‍यात आठ दिवस टाळेबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला. सुज्ञ नागरिकांनी त्याचे स्वागत केले; परंतु काहींचे विरोधाचे सूर उमटले. शहरातील व्यापारी मात्र टाळेबंदीवर ठाम आहेत. 

येथील तहसीलदार, पोलिस निरीक्षक, व्यापारी प्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक झाली. तीत तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी व्यापारी व जनतेवर टाळेबंदीचा निर्णय सोपविला. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी येत्या गुरुवारपासून (ता. 10) आठ दिवस तालुक्‍यात टाळेबंदी करावी, असा ठराव मांडला. त्यास इतर व्यापारी व संस्थांनी अनुमोदन दिले. त्यानंतर तहसीलदारांनी टाळेबंदी जाहीर केली. 

राहुरी फॅक्‍टरी येथे सोमवारी रात्रीच स्थानिक व्यापारी संघटनेने बैठक घेतली. नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत गिते, उपाध्यक्ष सुनील विश्वासराव व छोटे-मोठे व्यापारी या वेळी उपस्थित होते. चार महिने लॉकडाउन काळात छोट्या व्यापाऱ्यांचे खूप नुकसान झाले. एखाद्या व्यापाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यास बंद पाळू. मात्र, सध्या टाळेबंदी नको, असा सूर उमटला. राहुरीतील व्यापाऱ्यांनी टाळेबंदी ठेवली, तर तेथील नागरिक खरेदीसाठी राहुरी फॅक्‍टरी येथे येतील. त्यामुळे कोरोना संक्रमण वाढेल, या भीतीने काही व्यापाऱ्यांनी राहुरीत टाळेबंदी झाली, तर राहुरी फॅक्‍टरीवरील दुकानेही बंद ठेवावीत, असे सांगितले. शेवटी नगराध्यक्ष कदम यांच्यावर निर्णय सोपविला. 

राहुरी शहरातील भाजी विक्रेते, छोटे व्यावसायिक, रिक्षाचालक-मालक संघटना, रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी, भारिप- बहुजन महासंघाने तालुक्‍यात व शहरात टाळेबंदी करू नये, असे निवेदन तहसीलदार शेख यांना दिले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. 

तालुक्‍यात टाळेबंदीचा निर्णय व्यापारी व जनतेने घेतला आहे. शासनातर्फे टाळेबंदी नाही. तालुक्‍यात कोरोना संक्रमणाचा वेग दुप्पट झाला आहे. कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे, असे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion among the citizens about the lockdown in Rahuri