ओऽऽ हा रस्ता कोठे जातो, नाशिकला जाणार रोड कोणता आहे

आनंद गायकवाड
Monday, 10 August 2020

संगमनेर शहराबाहेरुन जाणाऱ्या नाशिक- पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावरील जवळपास सर्वच भुयारी बोगद्यांवर हा रस्ता कोठे जातो हे दर्शविणारे नामफलक नसल्याने, चालकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे.

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर शहराबाहेरुन जाणाऱ्या नाशिक- पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावरील जवळपास सर्वच भुयारी बोगद्यांवर हा रस्ता कोठे जातो हे दर्शविणारे नामफलक नसल्याने, चालकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे.

नाशिक पुणे या मोठ्या महानगरांना जोडणाऱ्या व मोठी वर्दळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर शहरातून जाणारी वाहतूक शहराबाहेरुन नेण्यासाठी मोठा बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला आहे. या नवीन रस्त्यामुळे तालुक्यातील एकमेकांना जोडलेली गावे विभक्त झाली. महामार्ग उंचावरुन गेल्यामुळे या गावांचे दळणवळण पूर्ववत सुरु ठेवण्याच्या दृष्टीने, संगमनेर तालुक्याच्या हद्दीत सुमारे सात ठिकाणी बाह्यवळण रस्त्याच्या खालून भुयारी मार्ग ( अंडरपास ) काढण्यात आले आहेत.

यामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूची गावे सरळ व काही सर्व्हिस रोडच्या माध्यमातून एकमेकांशी पुन्हा जोडली गेली. हा बाह्यवळण रस्ता वारंवार होणारे अपघात, सर्व्हिस रोडची अपूर्ण कामे यामुळे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाच, या सातही बोगद्यांवर खालून जाणारा रस्ता नेमका कुठे जातो हे दर्शविणारे नामफलकच नसल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या नवख्या प्रवाशांचा संभ्रम होत आहे.

या मार्गावर दक्षिणेकडून खांडेश्वर मंदिराच्या खांडगावकडे जाणारा, कासारवाडी शिवारातील मालपाणी इंडस्ट्रीजजवळचा अकोले तालुक्याकडे जाणारा सर्वात मोठा बोगदा, राजापूर ढोलेवाडी रस्ता, डॉ. तांबे हॉस्पिटलकडून राजापूरकडे जाणारा रस्ता, कृष्णा डेअरीकडे जाणारा सर्वात छोटा बोगदा, गुंजाळवाडी चौफुली व वेल्हाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर लहान मोठ्या आकाराचे अंडरपास आहेत.

वास्तविक यावर रस्ता पुढे कोणत्या गावाकडे जातो याचा नामनिर्देश करणारे फलक लावणे आवश्यक असतानाही, महामार्ग प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी गोंधळून जातात. इतरांच्या जाहिरातीने व्यापलेले हे दोन्ही बोगदे दोन्ही बाजूंनी गावांच्या नामफलकांनी सजविण्याची मागणी होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion among drivers as there is no sign on Nashik Pune highway in Sangamner city