येथे दुकानदारांमध्ये संभ्रम आणि भीती 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

लॉकडाउनसंदर्भात रविवारी (ता. 3) मध्यरात्री जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या आदेशानंतर आज शहरातील बाजारपेठेव्यतिरिक्‍त अन्य ठिकाणची काही दुकाने उघडली; मात्र दुकानदारांमध्ये आदेशासंदर्भातील संभ्रम व आदेशाच्या अंमलबजावणीतील अतिरेकाची भीती स्पष्ट दिसून आली. 

अहमदनगर : लॉकडाउनसंदर्भात रविवारी (ता. 3) मध्यरात्री जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या आदेशानंतर आज शहरातील बाजारपेठेव्यतिरिक्‍त अन्य ठिकाणची काही दुकाने उघडली; मात्र दुकानदारांमध्ये आदेशासंदर्भातील संभ्रम व आदेशाच्या अंमलबजावणीतील अतिरेकाची भीती स्पष्ट दिसून आली. 

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिलेल्या आदेशानुसार नगर शहरातील बाजारपेठ व बाजार संकुलात जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने सुरू राहतील. शहरातील एकल, वसाहतीलगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरू राहतील. तथापि, अशा भागात एखाद्या गल्लीत अथवा रस्त्यालगत पाचपेक्षा अधिक दुकाने असल्यास त्यांपैकी फक्‍त जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील, असे सांगण्यात आले आहे. पाचपेक्षा अधिक दुकाने कशी मोजायची? एखाद्या रस्त्याच्या एका बाजूस दोन व दुसऱ्या बाजूला चार दुकाने असतील, तर ती सुरू ठेवायची अथवा नाही? दुकाने सुरू करण्यास प्रशासनाची काही परवानगी लागते का, आदी प्रश्‍न दुकानदारांनी उपस्थित केले आहेत. याशिवाय, आदेश असतानाही पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली तर काय, अशीही भीती दुकानदारांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने, बऱ्याच दुकानदारांनी आज दुकाने बंदच ठेवणे पसंत केले. ज्यांनी आज दुकाने उघडी ठेवली, तेथेही ग्राहकांचा प्रतिसाद कमी होता. 

दुकानांसमोर वर्तुळे आणि मास्कची सक्ती 
ज्या दुकानदारांनी आज दुकाने उघडली, तेथे मास्क असल्याशिवाय ग्राहकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. तसेच, सोशल डिस्टन्सच्या पालनासाठी ग्राहकांना उभे राहण्यासाठी रस्त्यावर वर्तुळे आखण्यात आली होती. आज सोने, चप्पल, कपडे, खेळणी, भांडी, सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ आदी दुकाने उघडली नाहीत. सर्जेपुरा, कापड बाजार, मोची गल्ली, नवी पेठ आदी ठिकाणची सर्व दुकाने बंद होती. 

वाहनांच्या दालनांत सोशल डिस्टन्सिंग 
दुचाकी व चारचाकी वाहनांची दालने आज उघडली. येत्या दोन दिवसांत या दालनांमध्ये सर्व्हिसिंगची सुविधाही सुरू होणार आहे. त्या दृष्टीने आज सर्व्हिसिंग सेंटरमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया करण्यात आली. तसेच, ग्राहक आल्यास त्यांना सोशल डिस्टन्सच्या नियमानुसार बसण्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे. 

आज उघडलेली दुकाने 
दुचाकी वाहनांची दालने, मोबाईल दुरुस्ती व विक्री, रंगांची दुकाने, हार्डवेअर, इलेक्‍ट्रिक व इलेक्‍ट्रॉनिक उत्पादनांची दुकाने, वाहने व इतर वस्तू दुरुस्ती, मसाला विक्री, क्रॉकरी आदी. 

 
आज सकाळी दुकान उघडल्यापासून ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असला, तरी हा प्रतिसाद नेहमीपेक्षा कमी आहे. दुकाने सुरू ठेवण्याबाबतच्या प्रशासनाच्या आदेशाचा अर्थ कसा घ्यायचा, याबाबत संभ्रम आहे. 
- शहानवाज शेख, क्रॉकरी दुकानदार 

 
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी लॉकडाउनबाबत केलेले नियम हे दुकानदार व ग्राहकांच्या हिताचेच आहेत; मात्र दुकाने सुरू ठेवण्यासाठी दुकानदारांनाही परवानगी घ्यावी लागत असल्यास याबाबत प्रशासनाने माहिती द्यावी. 
- नंदकुमार ताठे, इलेक्‍ट्रिक दुकानदार 

 
जिल्हा प्रशासनाने आदेशात परवानगी दिली आणि पोलिस प्रशासनाने कारवाई करत दुकान बंद करायला लावल्यास काय करायचे? त्यामुळे दुकान जास्त वेळ उघडे ठेवता येत नाही. 
- मिलिंद भाबड, मोबाईल दुकानदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion and fear among shopkeepers here