पाण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेसमोर काँग्रेसचा हंडा मोर्चा

गौरव साळुंके
Tuesday, 6 October 2020

"पाणी उशाला, कोरड घशाला,' "श्रीरामपूरकरांना नियमित व स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे,' "पाणी आमच्या हक्काचे' अशा घोषणा देत येथील नगरपालिकेसमोर कॉंग्रेसच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात आला.

श्रीरामपूर (अहमदनगर) : "पाणी उशाला, कोरड घशाला,' "श्रीरामपूरकरांना नियमित व स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे,' "पाणी आमच्या हक्काचे' अशा घोषणा देत येथील नगरपालिकेसमोर कॉंग्रेसच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात आला.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष अनिल कांबळे, नगरसेवक संजय छल्लारे, संजय फंड यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले. शहरात नियमित व स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नसून, अनेक भागांत दूषित पाणी येते. पालिकेकडून अनेकदा रात्री-अपरात्री, सोशल मीडियाद्वारे संदेश पाठवून अचानकपणे "उद्या पाणी येणार नसल्या'चे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. शहरात नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करावा, पाणीपुरवठ्याबाबत काही निरोप असल्यास नगरसेवकांना तातडीने पाठवावा. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही. पाण्याची प्रभागनिहाय तपासणी करून पाण्याचा दर्जा सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन करून पालिकेच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा अनिल कांबळे यांनी दिला.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह नगरसेवक फंड व छल्लारे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत विविध मागण्यांचे निवेदन दिले. दिलीप नागरे, सुभाष तोरणे, दीपक कदम, रितेश एडके उपस्थित होते.

शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळित झाली असून, त्याला पालिका जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा माजी उपनगराध्यक्ष कांबळे यांनी दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress cauldron in front of Shrirampur Municipality for water