
जायकवाडीतून शेवगाव-पाथर्डीकरांना गाळमिश्रित पाणी
अमरापूर : एकीकडे दाहक उन्हाळा, तर दुसरीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग, अशा संकटाच्या स्थितीत शेवगाव- पाथर्डीसाठी जायकवाडी पाणीपुरवठा योजनेतून 10 ते 15 दिवसांतून एकदा गाळमिश्रित पाणी मिळत असल्याने, या योजनेतील गावांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली जार व्यावसायिकांनी चढ्या दराने पाणीविक्रीचा धंदाही जोमात सुरू केला आहे. (Contaminated water from Jayakwadi dam to Shevgaon-Pathardi)
शेवगाव- पाथर्डीसह 54 गावांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, विजेचा लपंडाव, जुन्या जलवाहिनीची फूटतूट, वेगवेगळ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून होणारी पाण्याची पळवापळवी, यामुळे योजनेतील गावांच्या टाक्या नियमित भरल्या जात नाहीत. त्या नियमित धुतल्याही जात नाहीत.
हेही वाचा: अजितदादांना लागली नीलेश लंकेंच्या आरोग्याची काळजी
धरणातील पाणी मराठवाड्यातील इतर गावांना कॅनॉलद्वारे सोडले जात आहे. त्यामुळे दहिफळ येथील पंपहाऊसमधून घाण, गाळमिश्रित व पिवळसर पाणी येत आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरू असताना शेवगाव शहरातून ग्रामीण भागातील व्हॉल्व्हचा पाणीपुरवठा रात्री-अपरात्री बंद करून नगरपरिषदेचे कर्मचारी शहरातील टाक्या भरण्यासाठी पाणी वळवतात. ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी रात्री-अपरात्री जागूनही गावाच्या टाकीत पाणी येत नाही. त्यामुळे आठ-दहा दिवसांतून एकदाच एका गावाला पाणी मिळते.
शिवाय, जलवाहिन्या जुन्या झाल्याने पाण्याच्या कमी-अधिक दाबाने त्या वारंवार फुटतात. त्यामुळे दुरुस्तीसाठी दोन-चार दिवसाचा कालावधी जातो. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना गाव- परिसरात सध्या पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. याचा फायदा जार व्यावसायिकांनी उचलला आहे. गावोगावी शुद्ध पाणी देण्याच्या नावाखाली मिळेल ते पाणी थंड करून, अवाच्या सवा किमतीला विकले जात आहे.
सध्या अमरापूर, आव्हाणे, ढोरजळगाव, वडुले, सामनगाव या ठिकाणी जार व्यावसायिकांचे प्लॅंट असून, 20 लिटर पाण्याचा जार 30 रुपये दराने विकला जातो. घरोघरी सध्या जारचेच पाणी वापरले जाऊ लागल्याने, ऐन उन्हाळ्याच्या टंचाई स्थितीत अनियमित पाणीपुरवठ्यामुळे जार व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. त्यांच्यामार्फत वाहनाद्वारे घरोघरी जाऊन पाणीपुरवठा केला जात असल्याने, पैसे देऊन का होईना; पण नागरिकांची मात्र सोय झाली आहे.(Contaminated water from Jayakwadi dam to Shevgaon-Pathardi)
Web Title: Contaminated Water From Jayakwadi Dam To Shevgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..