सततच्या पावसामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता

आनंद गायकवाड
Saturday, 26 September 2020

पावसाळ्यात घरांच्या आसपासच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात रानगवत उगते. तसेच पावसाचे पाणी साचल्याने तयार होणाऱ्या डबक्यात डासांच्या माद्या अंडी घालतात. यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होवून त्यांच्या द्वारे मलेरिया, हिवताप आदी आजारांचा प्रादुर्भाव होतो.

संगमनेर (अहमदनगर) : गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरासह सर्वत्र पावसाची दररोज हजेरी लागत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर आजारांकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असले तरी, नागरिकांच्या थोड्या दुर्लक्षामुळे साथजन्य आजारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
पावसाळ्यात घरांच्या आसपासच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात रानगवत उगते. तसेच पावसाचे पाणी साचल्याने तयार होणाऱ्या डबक्यात डासांच्या माद्या अंडी घालतात. यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होवून त्यांच्या द्वारे मलेरिया, हिवताप आदी आजारांचा प्रादुर्भाव होतो. याशिवाय पाणी बदलल्याने होणारे डायरिया, गॅस्ट्रोसदृष्य आजारही या दरम्यान डोके वर काढतात. 

आपल्या घराच्या परिसरात व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी त्यावर डासनिर्मूलन करणाऱ्या औषधांची फवारणी करणे, साचलेल्या पाण्यावर रॉकेल किंवा निकामी काळे ऑईल आदी टाकल्यास डासांच्या अळ्यांना श्वासोच्छवासाला अडथळा निर्माण होवून त्या नष्ट होत असल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ.तय्यब तांबोळी यांनी दिली.
 
शहरातील इमारतींच्या छतावर ठेवलेल्या रिकामे रंगाचे डबे, टायर्स, कुंड्या, फुटकी भांडी, पाईप, नारळाच्या करवंट्या, माठ तसेच पाण्याच्या विना झाकणाच्या उघड्या टाक्या आदी वस्तूंमध्ये तसेच बांधकामासाठी ठेवलेल्या खड्ड्यात पावसाचे स्वच्छ गोडे पाणी साठते. या पाण्यात डेंग्यू रोग पसरवणाऱ्या एडीस इजिप्टाय या डासांची मादी अंडी घालते. यातून निर्माण होणारे डास डेंग्यू सारख्या प्राणघातक रोगाचा प्रसार करतात.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात दिवसा चावणाऱ्या व अंगावर पांढरे पट्टे असलेल्या डासांची संख्या वाढली असून, नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नगरपरिषदेने डासांच्या निर्मूलनासाठी फावारणी करण्याची मागणी होत आहे.

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Continuous rains are expected to increase the incidence of communicable diseases