नगर महापालिकेने दिला जनावरे पकडण्याचा ठेका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

जनावरे पकडल्यानंतर तत्काळ जागेवर मालक सोडविण्यास आल्यास दंडाच्या पाच पट दंड आकारण्यात येईल.

नगर : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे दिसणे नित्याचे झाले आहे. मात्र, ही नगर शहरातील रस्त्यांची ओळख पुसण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पुण्यातील पिपल फॉर ऍनिमल संस्थेला कामाचा ठेका दिला आहे. 

महापालिका हद्दीतील मोकाट जनावरे पकडणे, कोंडवाडा करणे, देखभाल व तत्सम कामे करण्याबाबत पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील पिपल फॉर ऍनिमल संस्थेस कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.

शहरातील रस्त्यावर बकरी, मेंढी, करडू, बोकड आदी आढळल्यास प्रती जनावर 280 रुपये, गाढव, डुक्कर, वासरू आढळल्यास प्रती जनावर 280, घोडा, गाय, बैल, खेचर आदी प्रती जनावर 360 रुपये, उंट, म्हैस, रेडा प्रती जनावर 920 रुपये, हत्ती आढळल्यास एक हजार 20 रुपये प्रमाणे दंड करण्यात येणार आहे.

जनावरे पकडल्यानंतर तत्काळ जागेवर मालक सोडविण्यास आल्यास दंडाच्या पाच पट दंड आकारण्यात येईल. सात दिवसानंतर मालकांनी जनावरे सोडून न नेल्यास संबंधित जनावरांची लिलाव प्रक्रिया महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. तरी याबाबत जनावरांच्या मालकांनी दक्षता घेउन आपली जनावरे मोकाट सोडू नयेत, असे आवाहन महापालिकेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contract for catching animals given by the Municipal Corporation