esakal | श्रीरामपूरच्या स्वच्छतेचे काम सोडून ठेकेदाराने काढला पळ
sakal

बोलून बातमी शोधा

The contractor ran away leaving the cleaning work of Shrirampur

पालिका आता नव्याने निविदा काढणार कधी आणि शहरस्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागणार कधी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

श्रीरामपूरच्या स्वच्छतेचे काम सोडून ठेकेदाराने काढला पळ

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर ः शहर स्वच्छतेच्या ठेकेदाराने पगार थकविल्याने गेल्या चार महिन्यांपासून सफाई कामगार आर्थिक अडचणीत आहेत. त्यात स्वच्छतेचा पालिकेचा ठेका परवडत नसल्याने ठेकेदाराने ऐन सणासुदीत काम सोडल्याने, शहरस्वच्छतेसह सफाई कामगारांवरही बेरोजगारीची वेळ आली आहे.

पालिका आता नव्याने निविदा काढणार कधी आणि शहरस्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागणार कधी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पालिकेने सुमारे 25 लाखांना सफाईचा ठेका चांदवड येथील सुधर्म एजन्सीला दिला होता. मात्र, ठेकेदाराने जुलैमध्ये कामगारांचा पगार टप्प्याटप्प्यांत दिला. ऑगस्ट-सप्टेंबरचे पगार थकल्याने सफाई कामगारांनी प्रारंभी "काम बंद' व नंतर पालिकेसमोर आंदोलन केले. स्वच्छतेचे काम ठप्प झाल्याने शहरात कचऱ्याचे ढीग साचले. त्यामुळे पालिकेने संबंधित ठेकेदारास आगाऊ पेमेंट दिले.

ठेकेदाराने कामगारांना दोन महिन्यांचे पगार केल्याने सफाईचे काम सुरू झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा दोन महिन्यांचे पगार थकले. स्वच्छतेचा ठेकाच परवडत नसल्याने ठेकेदाराने ऑक्‍टोबरमध्ये सांगितले होते. 

दरम्यान, ठेकेदाराला ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खत बनविण्याच्या सूचना पालिकेने केल्या होत्या; परंतु ठेकेदाराने ही प्रक्रियाही पूर्ण केली नाही. स्वच्छतेचे कामकाज थांबविल्याने पालिकेसमोर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सफाईचा प्रश्‍न सोडविण्यासाठी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याने, पालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेपूर्वीच संबंधित ठेकेदाराने बुधवारी (ता. 11) रात्री शहरातून पळ काढला. सफाई कामगारांची जबाबदारी झटकली. ऐन दिवाळीत कामगार बेरोजगार झाले.

गेल्या तीन दिवसांपासून शहरस्वच्छतेचे काम पालिकेच्या कामगारांवर टाकले आहे. ऐन सण-उत्सवात शहरात सर्वत्र कचरा पडून असल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लवकरच नवीन ठेकेदाराबाबत निर्णय घेणार असल्याचे मुख्याधिकारी ज्ञानेश्‍वर ढेरे यांनी सांगितले.