esakal | विवाह समारंभ झाले मात्र जागरण गोंधळाला नाही परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

0jagran_20godhal

वाघ्या, मुरळी आणि झिलकरी या महाराष्ट्राच्या लोककलेची परंपरा जतन करणा-या लोककलावंतांची कोविडने ही अशी दैना केली आहे. विवाह समारंभ सुरू झालेत. मात्र अद्यापही जागरण गोंधळाला परवानगी नाही. सात महिन्यांपासून अंधारात चाचपडत असलेले हे कलाकार उजाडण्याची वाट पहात बसून आहेत.

विवाह समारंभ झाले मात्र जागरण गोंधळाला नाही परवानगी

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी (अहमदनगर) : वाघ्या अन संबळ टांगल खुंटीला आणि खंजीरी पेटीत ठेवली आहे. शेतातील काम होत नाही म्हणून मुरळी घरातच बसली आहे. झिलक-यांच तुणतूण आता वाजेनास झाल आहे. ते दुस-या कामाच्या शोधात आहेत. वाघ्या, मुरळी आणि झिलकरी या महाराष्ट्राच्या लोककलेची परंपरा जतन करणा-या लोककलावंतांची कोविडने ही अशी दैना केली आहे. विवाह समारंभ सुरू झालेत. मात्र अद्यापही जागरण गोंधळाला परवानगी नाही. सात महिन्यांपासून अंधारात चाचपडत असलेले हे कलाकार उजाडण्याची वाट पहात बसून आहेत. कोविडच्या मुकाबल्यासाठी पुढे आलेल्या, फिजीकल डिस्टन्स आणि मास्क या दोन्ही गोष्टी त्यांच्या मुळावर आल्या आहेत.

राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी ही प्रतीजेजुरी म्हणून ओळखली जाते. चंपाषष्टीला येथे यात्र भरते. त्यावेळी राज्याच्या विविध भागातून भाविकांबरोबरच जागरण गोंधळ सादर करणा-या कलावंतांची पथके देखील दुरवरून येतात. देवाच्या दारात आपली कला सादर करतात. या परिसरात वाघ्या मुरळीची पन्नासहून अधिक पथके आहेत. ज्यांनी बचतीचे महत्व ओळखले नाही, अशा कलाकारांवर उधार उसनवार करून चरितार्थ चालविण्याची वेळ आली आहे. 

संजय बाळाजी येणगे म्हणाले, कोविडचा कहर सुरू आहे. फिजीकल डिस्टन्स आणि मास्कला पर्याय नाही. अशा काळात आम्ही कला कशी सादर करणार. कोविड आहे तोपर्यत आमचे काही खरे नाही. ही कला सोडून आम्हाला दुसरे काही करण्याची माहिती व अनुभव नाही. कलावंतांना कष्टाची कामे कशी झेपतील. आमच्या समोर अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरे आम्हाला सापडत नाहीत.

वयाच्या सातव्या वर्षापासून ही कला शिकलो. आम्ही वाकडी येथे जागरण गोंधळ करणा-या कलाकारांसाठी संस्था स्थापन केली आहे. आजवर असा कठीण प्रसंग कधीही आला नव्हता. अनेक कलाकारांची खाण्याची पंचाईत झाली आहे. आमची खूप सुखाने कामे सुरु होते. आम्ही कलाकार संस्थेच्या वतीने वाकडीतील खंडोबा जवळ भाविकांसाठी अन्नछत्र चालवायचो. त्यांना उत्तम जेवण द्यायचो. आता कोविड आला तर आमच्यातील काहींची जेवण करायचे सुद्धा  अवघड झाले आहे.

संकटकाळात एकमेकांना मदत करतो. मात्र त्यास मर्यादा आहेत. संकट कधी दुर होईल, याची खात्री नाही. येणारा प्रत्येक दिवस अडचणी घेऊन येतो. आमचा व्यवसाय मुळात तुटपूंज्या कमाईचा आहे. रात्रभर जागरण गोंधळ घालायचा. चार झिलकरी आणि वाघ्या मुरळी मिळून पाच ते सात हजार रूपये बिदागी मिळते. त्यातून शिल्लक बाजूला पडणे कठीण आहे. जवळपास सर्व कलाकार अर्थिक अडचणीत सापडले आहेत. वाद्ये बाजूला ठेऊन खिन्न मनाने घरी बसून आहोत.  

वाकडी येथील वाघ्या मुरळी संस्थेचे संस्थापक संजय बाळाजी येणगे म्हणाले, जागरण गोंधळाच्या माध्यमातून आम्ही समाजप्रबोधन देखील करतो. तरूण पिढीची रूची वाढावी यासाठी विनोदी किस्से व नकलांचा देखील समावेश करतो. त्याचा प्रतिसाद देखील खूप चांगला मिळतो. मात्र बिदागीची रक्कम वाढत नाही. ही खंत राज्यातील सर्वच कलाकारांच्या मनात आहे. नव्या पिढीने या कलावंतांना सन्मान द्यावा. सुखाचे चार घास खायला मिळतील, अशी बिदागी कर्तव्यभावनेतून द्यायला हवी. कोविडच्या संकटाने, कलावंतांनी बचतीची सवय लावावी. असा धडा आम्हाला दिला आहे.

संपादन :  सुस्मिता वडतिले

loading image