कोरोनाने जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याचा मृत्यू

दौलत झावरे
Tuesday, 28 July 2020

जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

नगर : जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याला श्रध्दांजली म्हणून जिल्हा परिषदेतील कामकाज मंगळवारी (ता. 28) बंद ठेवण्यात आलेले आहे, अशी माहिती सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली. 
जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कामकाज करत असताना मागील आठवड्यात त्रास झाला होता. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यानंतर त्यांनी कोरोनाची तपासणी करून घेतली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातच त्यांचा मृत्यू झालेला आहे. एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मृत्यूमुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली असून त्यांना श्रध्दांजली म्हणून जिल्हा परिषदेतील कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झालेली असल्याचे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चा सुरु होती. 

जिल्हा परिषद लॉकडाउन करा ः परजणे 
जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधीत सापडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे कामकाज आठ दिवस बंद ठेवावे, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी व्यक्त केली आहे. 

कामकाज रविवारपर्यंत बंद ठेवा 
जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण सापडत लागलेले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने रविवारपर्यंत जिल्हा परिषदेतील कामकाज सोमवार (ता. तीन) पासून सुरु करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. 

संपूर्ण इमारत दिवसभरात दोन सॅनिटाईझ करा 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असून जिल्हा परिषदेत कामकाजानिमित्‌ येणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे जिल्हा परिषदेची संपूर्ण विभागच दिवसभरातून दोनदा सॅनिटाईझ करणे गरजेचे असून प्रशासनाने त्याकडे गांभिर्याने लक्ष द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांसह कर्मचाऱ्यांमधून होत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona dead Ahmednagar Zilla Parishad officer