कोरोनामुळे नगरमध्ये साडेचार हजार कंटेन्मेंट झोन

सूर्यकांत वरकड
Monday, 28 September 2020

रुग्णांकडून खासगी रुग्णालये जास्त बिल आकारत असल्याची तक्रारी आल्याने जिल्हा प्रशासनाने या बिलांवर निरीक्षक पथक नेमले आहे. असे असतानाही मात्र, या पथकाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. 
 

नगर ः जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा आता उघडू लागल्या आहेत. नागरिकही बेफिकिरीने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजविल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4375 कन्टेन्मेंट झोन झालेले आहेत. कोरोना थांबविण्यासाठी झटणारे 56 शासकीय अधिकार, कर्मचारी व त्यांच्या सहाय्यकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तरीही नागरिकांची बेफिकीरी कायम आहे. 

भीती न आम्हा जराही 
केंद्र व राज्य शासनाने नागरिकांचे होणारे आर्थिक हाल कमी व्हावेत यासाठी लॉकडाउन शिथिल केला. याचा मात्र काही नागरिकांनी गैरफायदा घेत अनावश्‍यक कामांसाठी घराबाहेर पडण्यास सुरवात केली. पर्यटन स्थळांवर गर्दी वाढू लागली. बंद असलेल्या ऐतिहासिक स्मारकांची लोखंडी दारे तोडण्याचाही काहींनी प्रताप केला. सोशल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन घालत स्वैर फिरणाऱ्यांमुळे नगर शहरातील हद्दपार होऊ लागलेला कोरोना शहरात पोसला गेला आहे. दुचाकीवर तीन प्रवासी, चार चाकीत चार पेक्षाही जास्त प्रवासी ही बाबत आता नित्याची झाली आहे. प्रार्थनास्थळे सोडून सर्व ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. 

जिल्हा प्रशासनाने केले हे उपाय 
जिल्ह्यात सध्या 47 कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार 375 ठिकाणी कन्टेन्मेंट झोन करण्यात आले होते. या झोनमध्ये सात लाख 63 हजार 396 नागरिक होते. एक लाख 56 हजार 148पेक्षाही जास्त नागरीक होमक्‍वारंटाईन राहिले. जिल्हा प्रशासनाकडे 88 तर खासगी दवाखान्यांकडे 15 ऍम्ब्युलन्स आहेत. महापालिका प्रशासनाकडे कोविड रुग्णांचे शव वाहून नेण्यासाठी दोन वाहने आहेत. मात्र ही दोन्ही वाहने मोडकळीस आलेली आहेत. 
जिल्हा प्रशासनाने शासकीय व खासगी हॉस्पिटल मिळून दोन हजार 783 बेडची व्यवस्था केलेली आहे. 216 व्हेंटिलेटर आहेत. 

खासगी रुग्णालयांची बिले 
रुग्णांकडून खासगी रुग्णालये जास्त बिल आकारत असल्याची तक्रारी आल्याने जिल्हा प्रशासनाने या बिलांवर निरीक्षक पथक नेमले आहे. असे असतानाही मात्र, या पथकाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. 
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona has four and a half thousand containment zones in Ahmednagar