त्या जुळ्यांसाठी कोण गाईल अंगाई... काल जन्म दिला आज कोरोनाने नेली आई

Corona patient dies after giving birth to two children
Corona patient dies after giving birth to two children

नगर ः कोरोना हररोज माणुसकीचीच परीक्षा पाहत आहे. भुकेलेल्यांसाठी लंगरद्वारे लोकांना अन्नदान करणारे, तसेच डॉक्टर, नर्स यांच्याच तो जीवावर उठला आहे. त्यामुळे मदतीलाही मर्यादा येत आहेत. लॉकडाउनच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस यंत्रणा रस्त्यावर आहे. त्यांनाही मोठ्या प्रमाणात बाधा होत आहे. कोरोनामुले रोज होणारा एक मृत्यू हजारो लोकांना वेदना देत आहे. कोरोनाने नातेवाईकांची केलेली ताटातूट जिव्हारी लागणारी आहे. नगरमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना सगळ्यांचेच ह्रदय पिळवटून गेली.

नगर शहराजवळ निंबळक नावाचे गाव आहे. तेथील एक विवाहिता डिलिव्हरीसाठी माहेरी गेली. आई-भावाच्या छत्रछायेत डिलिव्हरी झाली तर कुठलीच अडचण येणार नाही, असे तिला वाटलं. म्हणून ती गरोदरपणात निंबळकहून मुंबईला माहेरी गेली. माहेरकडील लोकांनी तिची पुरेपूर काळजी घेतली. परंतु मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागल्याने ती पुन्हा सासरी आली. रेड झोनमधून आल्याने तिची तपासणी करण्यात आली आणि ती कोरोना बाधित निघाली.

दहा वर्षांनी पाळणा हलला पण...

त्या महिलेचा भाऊ मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. तेथे अनेक रूग्णांचा वावर असतो. त्याला न कळत कोरोनाची बाधा झाली. तपासणीअंती हे लक्षात आल्यानंतर बहिणीला परत सासरी पाठवण्याचा निर्णय झाला. त्या महिलेला नगरला आणलं पण तीही बाधित निघाली. आणि सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारण तब्बल दहा वर्षांनंतर ती आई बनणार होती. त्यामुळे तिच्यासह कुटुंबीयांना केवढा आनंद होता. परंतु रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सगळ्यांच्याच उरात धडकी भरली. काय करावं सुचेना. डॉक्टरही अस्वस्थ होते. मात्र, काल सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. कारण ती बाळंतीण झाली आणि दोन गोंडस जुळ्यांना तिने जन्म दिला. तिच्या चेहऱ्यावरील काळजीची जागा आनंदाने भरून गेली.

काल अख्खा दिवस सिव्हिल आणि माध्यमांत त्या मातेची आणि बाळांचीच चर्चा होती. चांगलं झालं संकट टळलं, असेच सगळे म्हणत होते. आज मात्र, अघटित घडलं. सकाळी ८-४५ची वेळ होती. त्या मातेला मृत्यूने घेरलंच. या महिलेचे काल सिझरियन करणारे डॉक्टरही परेशान झाले. त्यांनी सांगितलं त्या दोन्ही बाळांची तब्बेत ठीक आहे. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या महिलेला न्यूमॅटिक लक्षणे होती, असे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे सांगतात. 

त्या चिमुरड्यांना माहितीही नाही की आपली आई जग सोडून गेलीय. अगदी सिनेमातील कथेसारखी ही घटना घडली. संबंधित महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाच आहे. परंतु सर्व नगरकरांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली. निंबळकमध्ये तर स्मशान शांतता आहे. त्या महिलेच्या पतीची चाचणी करण्यात आली आहे. तो निगेटिव्ह आहे. परंतु सर्वांच्या तोंडी एकच प्रश्न, आता त्या मुलांचं काय...

कोरोना दररोज अशा ह्रदयद्रावक कहाणीला जन्म घालीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com