श्रीगोंद्यात कोरोना आला आटोक्यात पण व्हेंटिलेटर मिळेना

संजय आ. काटे
Friday, 4 September 2020

तालुक्‍यात एकही व्हेंटिलेटर नसल्याची माहिती आहे. कोरोनाचे रुग्ण अचानक वाढले, तर त्यांच्यासाठी एखाद्या वसाहतीत ठेवण्याची व्यवस्था नाही. कुठेच सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टीम नाही. त्यामुळे नेते व प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

श्रीगोंदे : तालुक्‍यात कोरोनाबाधितांचा आकडा 919 वर पोचला असला, तरी त्यातील केवळ 60 जण ऍक्‍टिव आहेत. सध्या तालुक्‍यात कोरोना आवाक्‍यात असला, तरी अनेक रुग्णालयांत इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्‍टरही घाबरत आहेत. तालुक्‍यात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. मोफत उपचार देणारे मोठे रुग्णालय नसतानाच, सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टीम नसल्याची शोकांतिका आहे.

सध्या श्रीगोंद्यात कोरोना रुग्णांचा आकडा रोज फुगत असल्याने प्रशासन व विशेषत: आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. आजपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 919 वर पोचली आहे. त्यातील 26 जणांचा मृत्यू झाला. रोज साधारण 20-30 लोक कोरोनाबाधित निघत आहेत. कोरोना वाढत असताना, केवळ तालुका आरोग्य विभागच त्याच्याशी लढा देताना दिसतो.

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून पोलिस मदत करीत आहेत. मात्र, महसूल विभाग व पालिका गंभीर दिसत नसल्याच्या तक्रारी आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना ठेवले जाते, तेथे स्वच्छता नसते. रुग्णांना व्यवस्थित जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही बाब महसूल व पालिका प्रशासनाकडे आहे. मात्र, तेच गंभीर नसल्याचे चित्र आहे. 
मास्क व सॅनिटायझर वाटपासाठी काही नेते पुढे आले. मात्र, तालुक्‍यात कोविड सेंटर, मोठे रुग्णालय सुरू करण्यासाठी आमदार, माजी आमदार, कारखानदार, सत्ताधारी पक्षाचे नेते कुणीही पुढाकार घेतला नाही.

नागवडे कारखान्याने ग्रामपंचायत व पालिकेला आर्थिक मदत केली. तालुक्‍यात एकही व्हेंटिलेटर नसल्याची माहिती आहे. कोरोनाचे रुग्ण अचानक वाढले, तर त्यांच्यासाठी एखाद्या वसाहतीत ठेवण्याची व्यवस्था नाही. कुठेच सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टीम नाही. त्यामुळे नेते व प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

तालुक्‍यातील रुग्णसंख्या आता कमी होत असून, सुविधा आहेत. लोकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये. आरोग्य विभाग कोरोनाविरुद्ध चार हात करीत असून, त्याला नागरिकांनी साथ द्यावी. 
- डॉ. नितीन खामकर, तालुका आरोग्य अधिकारी 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients in Shrigonda did not get a ventilator