श्रीगोंद्यात इतक्या गावांत सापडले कोरोना रूग्ण

संजय आ. काटे
Thursday, 17 September 2020

तालुक्‍यात आतापर्यंत 29, तर तालुक्‍याबाहेरील रुग्णालयांत दाखल झालेले येथील 14 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले. बाधित रुग्णांच्या प्रमाणात मृत्यू 3.19 टक्के आहेत. 

श्रीगोंदे : तालुक्‍यात रोज वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या धडकी भरविणारी आहे. आतापर्यंत 87 गावांतील 1348 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांतील 1193 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 126 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यादरम्यान 43 रुग्णांनी जीव गमावला. प्रशासन त्यांच्या पातळीवर लढा देत असले, तरी कोरोनाचे वाढते प्रमाण धोकादायक आहे. 

तालुक्‍यात कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्च रोजी आढळला. त्या दिवसापासून आजपर्यंत, म्हणजे 191 दिवसांत 5203 जणांची चाचणी केली. त्यांत 1348 बाधित निघाले. त्यात 884 पुरुष (66 टक्के), तर 464 महिला (34 टक्के) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.50 टक्के आहे. 

तालुक्‍यात आतापर्यंत 29, तर तालुक्‍याबाहेरील रुग्णालयांत दाखल झालेले येथील 14 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले. बाधित रुग्णांच्या प्रमाणात मृत्यू 3.19 टक्के आहेत. 

कोरोनाबाधित "टॉप टेन' गावे 
श्रीगोंदे शहर- 339, काष्टी- 121, पेडगाव- 61, बेलवंडी बुद्रुक- 55, कोळगाव- 44, घारगाव- 42, मढेवडगाव- 35, पारगाव सुद्रिक- 31, जंगलेवाडी- 31, हंगेवाडी- 28. या दहा गावांत 787 कोरोनाबाधित, तर उर्वरित 77 गावांत 551 बाधित रुग्ण आहेत. 

लोकांनी नाहक बाहेर फिरू नये. लक्षणे दिसताच यंत्रणेशी संपर्क साधावा. आरोग्ययंत्रणेसह प्रशासन लोकांसोबत असून, घाबरून जाऊ नये. काळजी घेतली तर कोरोना लवकर घालविण्यास मदत होईल. 
- डॉ. नितीन खामकर, तालुका आरोग्य अधिकारी 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients were found in so many villages in Shrigonda