
आज सकाळी चार कैद्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांची कोरोना तपासणी झाली. त्यात ते पॉझिटिव्ह आल्याने अन्य कैद्यांची तातडीने तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. दुपारपर्यंत चाचणी सुरू होती.
श्रीगोंदे : नगर जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. तो आता बंदिवानांच्याही मागे लागला आहे. कोठडीतील कैदी कसे काय बाधित होतात, हाही प्रश्न सर्वसामान्यांसह प्रशासनालाही सतावत आहे. जिल्ह्यात यापूर्वी संगमनेर, कोपरगाव, राहुरी, कर्जतमधील कैदी बाधित झालेले आहेत. हे लोण आता श्रीगोंद्यातही आले आहे.
श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील कारागृहात असलेल्या 55पैकी 36 कैदी कोरोनाबाधित निघाल्याने खळबळ उडाली आहे. यात अनेक कैदी गंभीर गुन्ह्यांतील असून, त्यांना आता नगरला हलविण्यात आले आहे. त्यांच्या बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले.
आज सकाळी चार कैद्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांची कोरोना तपासणी झाली. त्यात ते पॉझिटिव्ह आल्याने अन्य कैद्यांची तातडीने तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. दुपारपर्यंत चाचणी सुरू होती. 55 कैद्यांची तपासणी केल्यावर त्यांतील 36 जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
जे कैदी कोरोनाबाधित आले, त्यांमध्ये खून, दरोडे, बलात्कार, असे आरोप असलेले आरोपी असल्याने यंत्रणा सावध झाली आहे. या कैद्यांना नगरच्या कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.
संपादन - अशोक निंबाळकर