esakal | कोविड सेंटरमधून कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाला
sakal

बोलून बातमी शोधा

Corona positive prisoner escaped from Covid Center

राहुरी कृषी विद्यापीठ येथे नगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी तयार केलेल्या तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमधून शनिवारी सकाळी एक कैदी पळाला आहे.

कोविड सेंटरमधून कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाला

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राहुरी कृषी विद्यापीठ येथे नगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी तयार केलेल्या तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमधून शनिवारी सकाळी एक कैदी पळाला आहे. तो पारनेर येथे कारागृहात कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे नगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी 'शेतकरी निवास'मध्ये तात्पुरत्या स्वरूपात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. तेथे श्रीरामपूर, पारनेर व नेवासा पोलिस ठाण्याच्या उपकारागृहातील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले ५५ कैदी ठेवले होते. पैकी एका कैद्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आज पलायन केले. त्यामुळे, आता या सेंटरमध्ये ५४ कैदी राहिले आहेत. शेतकरी निवास इमारतीच्या आसपास जिल्ह्यातील पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे. शिवाय इमारतीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून कैदी पसार झाल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांनी नगर येथे सबजेल जवळ एका शाळेची पाहणी करून, जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात राहुरी येथे कृषी विद्यापीठातील इमारतीत कोरोना बाधित कैद्यांना ठेवले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर