कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोधण्याचे आव्हान! कोरोनामुळे निदान, उपचाराचे प्रमाण घटले

दौलत झावरे
Monday, 30 November 2020

कोविडमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत घटले आहे.

अहमदनगर : कोविडमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत घटले आहे. आता 1 ते 31 डिसेंबरदरम्यान समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी जिल्हा संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहीम-2020 हाती घेण्यात आली आहे. 

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. या अभियानाची ऑनलाइन बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व समुदाय अधिकाऱ्यांना त्यात मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील 30 टक्के लोकसंख्येचे या मोहिमेत एक ते 15 डिसेंबरपर्यंत सर्वेक्षण होणार आहे. नंतर 16 ते 31 डिसेंबरदरम्यान रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. 

समाजातील प्रथम अवस्थेतील विनाविकृती कुष्ठरुग्ण शोधून त्वरित उपचाराखाली आणणे, कुष्ठरोगाच्या संसर्गाची साखळी खंडीत करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अभियानासाठी जिल्हा, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियोजनबद्धरित्या 2856 पथके तयार केली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके व जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी केले आहे. 

अभियानाचा उद्देश 

कुष्ठरोग : 
समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून संसर्गाची साखळी खंडीत करणे, नवीन कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण दर 10 लोकांमागे एक असून, ते कमी करणे. कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे. 

क्षयरोग : 
क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करणे. मोहिमेत प्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेटी देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्यांचा शोध घेणे. संशयीत क्षयरुग्णांचे थुंकीचे नमुने व एक्‍स-रे तपासणी, तसेच आवश्‍यकतेनुसार इतर तपासण्या करून क्षयरोगाचे निदान व औषधोपचार सुरू करणे. 

  • अशी राबविणार मोहीम 
  • - विविध समित्यांची स्थापना, बैठकांद्वारे नियोजन व अंमलबजावणी 
  • - विविध स्तरावर सुक्ष्म कृतिआराखड्यानुसार अभियानाचे नियोजन 
  • - प्रशिक्षित आशा व पुरुष स्वयंसेवक, पर्यवेक्षकांना प्रशिक्षण 
  • - कार्यक्षेत्रात अभियानाची प्रसिद्धी, आरोग्य शिक्षण कार्यक्रम 
  • - एक ते 16 डिसेंबर प्रत्यक्ष सर्वेक्षण 
  • - सर्व स्तरावरून प्रभावी सनियंत्रण व पर्यवेक्षण 
  • - विविध स्तरावर विहित कालावधीत अहवाल सादरीकरण 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona reduced the incidence of leprosy and tuberculosis