हुश्श, इंग्लंडहून आलेल्या वीसजणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020

आरोग्य विभागाकडून या कालावधीत इंग्लंडहून परतलेल्यांची यादी जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात विशेष सर्वेक्षणाअंती 19 जण महानगरपालिका हद्दीतील तर सहाजण ग्रामीण भागातील आढळून आले आहेत.

नगर ः इंग्लंडमधून जिल्ह्यात आलेल्या 25 प्रवाशांपैकी 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. उर्वरित पाच जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू आढळला आहे.

या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाकडून या कालावधीत इंग्लंडहून परतलेल्यांची यादी जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात विशेष सर्वेक्षणाअंती 19 जण महानगरपालिका हद्दीतील तर सहाजण ग्रामीण भागातील आढळून आले आहेत. त्यातील 25 पैकी 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 उर्वरित पाच जणांचे आरटीपीसीआर तपासणीसाठी नमुने घेण्यात आले असून अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. इंग्लंडहून परतलेल्या नागरिकांनी स्वत:हून महानगरपालिका, जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे. 
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of twenty from England is negative