लॉकडाऊन : कोपरगावात दोन दिवसात १३ हजार नागरिकांची सर्व्हे

मनोज जोशी
Sunday, 30 August 2020

कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने सरकारने चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला.

कोपरगाव (अहमदनगर) : शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने सरकारने चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनमध्ये पहिल्या दोन दिवसात शहरातील विविध विभागात 2454 कुटुंबांतून तब्बल १३ हजार लोकसंख्येचा सर्व्हे करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने 28 ते 31 ऑगस्ट हा चार दिवसांचा लॉकडाऊन शहरासाठी लागू केला. अत्यावश्यक सेवा सुविधा वगळता सर्व आस्थापने शंभर टक्के बंद ठेवून नागरिकांनी देखील प्रशासनास सहकार्य केले आहे. 28 ऑगस्टला शहरातील विवेकानंद नगर, कालेमळा सप्तर्षी मळा, टिळकनगर या चार भागांमधील 725 कुटुंब व 3300 लोकसंख्येचा सर्व्हे करण्यात आला. संत ज्ञानेश्वर स्कूल येथे नागरिकांची तपासणी करण्यात आली. ५४ लोकांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात आठ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 29 ऑगस्टला शहरातील गांधी नगर, गोरोबा नगर, महादेव नगर या दाट लोकवस्ती असलेल्या भागातील 1729 कुटुंबातून 9700 लोकसंख्या यांचा सर्व्हे करण्यात आला आहे.

शनिवारी 181 रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यात 23 जण बाधित असल्याचे तर 42 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले, ज्या भागात शहरात सर्व्हे करायचे शासनाने नियोजित केले आहे. त्या भागात रिक्षाद्वारे भोंगा फिरवला जात असून नागरिकांनी घरीच थांबून शासनाला मदत करावी, जेणेकरून घरातील सर्व कुटुंबीयांची तपासणी करणे शक्य होईल. या सर्व्हेमधून कोणी सुटले तर त्यांनी स्वतः हून समोर येऊन तपासणी करून घ्यावी. ज्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल.

डॉ. कृष्ण फुलसौंदर म्हणाले,शहरात लॉकडाऊन केल्यामुळे व सर्वेक्षण सुरू केल्यामुळे निश्चितच फायदा जाणवत आहे. या सर्व्हरमध्ये रुग्ण सापडले त्यांनी हा आजार पसरवणारा असता. मात्र सर्वेमध्ये सदरचे व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने साखळी तोडण्यास मदत झाली आहे. एकंदरीत वैद्यकीय पथकांच्या वतीने शहरात सुरू असलेले सर्वेक्षण निश्चितच फायद्याचे ठरणार असून यातून या आजाराची साखळी तोडणे व रुग्ण संख्या कमी करण्यास हातभार लागणार आहे. नागरिकांनी व्यापाऱ्यांनी देखील कोपरगाव कडकडीत बंद ठेवून शासनाला सहकार्य केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Survey of 13000 citizens in two days in Kopargaon