esakal | रस्त्यावर आले नि कोविड सेंटरमध्ये नेले
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus antigen test

रस्त्यावर आले नि कोविड सेंटरमध्ये नेले

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर : नगरपालिकेच्या आरोग्यपथकाने आज (ता. 17) बसस्थानक परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजेन तपासणी केली. त्यात पहिल्या अर्ध्या तासात दहा जणांची चाचणी केली. त्यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांची रवानगी थेट कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली.

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने राज्यात "लॉकडाउन' लागू करण्यात आले आहे. असे असतानाही शहरात अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संगमनेर नगरपालिकेच्या आरोग्यपथकाने आज सकाळपासून बसस्थानक परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी सुरू केली. पहिल्या अर्ध्या तासात दहा जणांची तपासणी करण्यात आली. त्यांतील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांची रवानगी थेट कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली. (Corona test of people walking on the road in Sangamner)

हेही वाचा: ढील दिली, महागात पडली! पुन्हा नगर शहरात कडक लॉकडाउन

आज सकाळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदींच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या वैद्यकीय पथकाने फिरते चाचणी केंद्र उभारले.

यावेळी दुचाकीवर डबल, ट्रिपल सीट जाणाऱ्यांना थांबवून 96 जणांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यांत चार जण पॉझिटिव्ह आढळले. शनिवारी (ता. 15) गणेशनगर परिसरात सहा व रविवारी (ता. 16) मालदाड रस्ता परिसरात पाच जण पॉझिटिव्ह आढळले होते.

घराबाहेर पडू नका

नगरपालिका प्रशासन कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, काही जण विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत. त्यातील बाह्य लक्षणे नसलेले रुग्ण कोरोना संसर्गाचा प्रसार करीत आहेत. चाचणीतून असे रुग्ण उघड होऊन त्यांना विलगीकरणात पाठविणे शक्‍य होत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे.

- डॉ. सचिन बांगर, मुख्याधिकारी, संगमनेर नगरपालिका

(Corona test of people walking on the road in Sangamner)