
पुढे बोराटे म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर व घातक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यादृष्टीने उपाययोजना होणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
अहमदनगर : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास महापालिकेचा नियोजनशून्य कारभारच जबाबदार आहे, असा आरोप नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी 'सकाळ'शी बोलताना केला.
पुढे बोराटे म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर व घातक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यादृष्टीने उपाययोजना होणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. कोरोना लसीकरण व स्वॅब संकलन केंद्रे एकाच ठिकाणी आहेत. तेथे नागरिकांची गर्दी होते. गर्दी नियंत्रणात ठेवण्याची कोणतीही उपाययोजना केलेली नाही. स्वॅब दिलेल्या नागरिकांच्या हातावर 'होम क्वारंटाईन'चे शिक्केही मारले जात नाहीत. तपासणी अहवाल पाच ते सात दिवसांनी प्राप्त होत आहेत. त्यामुळे स्वॅब दिलेले नागरिक शहरभर फिरून संसर्ग वाढवीत आहेत.'
'बरेचसे कोरोनाबाधित खासगी दवाखान्यांमध्ये औषधे घेऊन 'होम क्वारंटाईन' होत आहेत. त्यांच्या घरांवर त्याबाबतचा फलक लावला जात नाही. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जात नाही. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. महापालिकेने मोठा खर्च करून नटराज हॉटेलमध्ये कोविड सेंटर सुरू केले. रुग्णसंख्या कमी झाल्यावर ते बंद ठेवण्यात आले होते. या काळात तेथील पंखे व गीझर चोरीला गेले. त्याचा तपास लावून संबंधितांवर कारवाई करावी. अधिकाऱ्यांनी वातानुकूलित कक्षामध्ये बसून निर्णय घेण्याऐवजी नागरिकांत जाऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात. नगरसेवकांना विचारात घेऊन उपाययोजना आखाव्यात,' अशी मागणी बोराटे यांनी केली आहे.
कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळ
महापालिकेकडे मास्क, सॅनिटायझर व औषधे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, त्याचा उपयोग कर्मचाऱ्यांसाठी केला जात नाही. हे साहित्य कुलपात ठेवून अधिकाऱ्यांना काय साध्य करायचे आहे? कोरोना रुग्ण नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शववाहिन्याही खराब आहेत. त्यावरील कर्मचाऱ्यांना पीपीई किट दिली जात नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी महापालिकेने खेळ चालविला आहे, असा गंभीर आरोप बाळासाहेब बोराटे यांनी केला आहे.