स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली त्या दोघांची सुरू होती दुसरीच तयारी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बाहेरगावाहून आलेली ही तरुणी शहरात राहत होती. त्या वेळी आरोपी प्रवीण खेडकर याच्याशी तिची ओळख झाली.

नगर : स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी बाहेरगावाहून शहरात आलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून, नगर-पुणे रस्त्यावरील केडगाव येथील लॉजवर एकाने अत्याचार केला.

प्रवीण शिवाजी खेडकर (रा. भालगाव, ता. पाथर्डी) असे यातील आरोपीचे नाव आहे. 

याबाबत पीडित तरुणीने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बाहेरगावाहून आलेली ही तरुणी शहरात राहत होती. त्या वेळी आरोपी प्रवीण खेडकर याच्याशी तिची ओळख झाली. त्याने आठ नोव्हेंबर रोजी नगर-पुणे रस्त्यावरील एका हॉटेलवर तिला नेले.

तेथे जेवण झाल्यानंतर त्याने तरुणीला लॉजवर नेले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्याचे फोटो काढले. मात्र, नंतर तो टाळू लागला. तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवून शून्य क्रमांकाने कोतवाली पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे. 

खेडे गावातून येणाऱ्या मुलींना फूस लावण्याचे काम अनेकजण करीत असतात. त्यातून या मुली आमिषाला बळी पडतात. मुलींनी अशा तरूणांपासून सावध रहावे, याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The couple was preparing for the wedding under the name of competition exam