गुप्तधनाच्या लालसेने हत्या; १२ जणांविरुद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar

गुप्तधनाच्या लालसेने हत्या; १२ जणांविरुद्ध गुन्हा

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथे गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटात मायलेकीचा मृत्यू झाला होता. ६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी मृत महिलेच्या भावाने न्यायालयात खासगी फिर्याद दिली होती. त्यानुसार न्यायालयाने गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार काल (ता. २०) भोंदूबाबांच्या म्हणण्यानुसार गुप्तधनाच्या लालसेने कट करून हत्या केल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत अशोक शेलार (वय ४५), अशोक ठमाजी शेलार (वय ७०), लीलाबाई अशोक शेलार (वय ६३), बाळासाहेब अशोक शेलार (वय ५२), कविता बाळासाहेब शेलार (वय ४७), पवन बाळासाहेब खरात (वय ३८), काजल किशोर खरात (वय २५), किशोर सुखदेव खरात (वय ३५, सर्व रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर), अनिकेत पाटोळे (वय ३५, रा. कोल्हार, ता. राहाता), गागरे बाबा, सांगळे बाबा, देवकर गुरू (पूर्ण नाव, पत्ते माहीत नाहीत) अशी आरोपींची नावे आहेत.

बेलापूर येथे ६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी सातच्या सुमारास गॅसगळती होऊन स्फोट झाला होता. यात ज्योती व नमोश्री शशिकांत शेलार (वय ९) ह्या जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत ज्योती हिचा भाऊ राजेंद्र कचरू नन्नवरे (रा. पिंपळाचा मळा, राहुरी) यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दिली होती. त्यात भोंदूबाबांच्या म्हणण्यानुसार, वरील आरोपींनी संगनमत करून गॅस गळतीचा स्फोट जाणून बुजून गुप्तधनाच्या लालसेपोटी कट करून घडवून आणलेला आहे. यात भाची नमोश्री व बहीण ज्योती यांचा अपघाताने झालेला मृत्यू नसून त्यांची हत्या केली. तसेच पुराव्याची विल्हेवाट लावल्याचे नमूद करण्यात आले होते.

न्यायालयातून पोलिसांना ही फिर्याद प्राप्त झाल्यानंतर शहर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याकरिता व त्यांचे समूळ उच्चाटनाकरिता अधिनियम २०१३ चे कलम ३(१)(२) प्रमाणे आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. सहायक निरीक्षक जीवन बोरसे अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, स्फोट झाल्यानंतर तत्कालीन अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दीपाली काळे, निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसेच एटीएस पथकानेही पाहणी करत आसपासच्या नागरिकांकडेही चौकशी केली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकासह जंजिरा नामक कुत्रा व आधुनिक यंत्राच्या मदतीने सर्वत्र स्फोटक पदार्थाचा शोध

घेण्यात आला. परंतु आक्षेपार्ह किंवा संशयास्पद काही आढळले नव्हते. त्यामुळे हा स्फोट गॅसगळतीमुळे झाल्याच्या निष्कर्षापर्यंत सर्व जण त्यावेळी पोचले होते. आता वाढीव कलम लागल्याने मृत्यू गॅसगळतीमुळे झाला, की गुप्तधनापोटी, ह्याचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे.

Web Title: Crime Against 12 Persons Murder Mileki Was Killed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..