पोलिस ठाण्याची पायरी... नको रे बाबा... ‘येथे’ फिर्यादीचे प्रमाण झाले कमी

विनायक दरंदले
Tuesday, 4 August 2020

मागील आठवड्यात सोनई पोलिस ठाण्यातील सातजण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.

सोनई (अहमदनगर) : मागील आठवड्यात सोनई पोलिस ठाण्यातील सातजण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. तक्रार द्यायची मात्र पोलिस ठाण्याची पायरी नको रे बाबा.. अशी अवस्था होवून बसली आहे.

सोनईतील एकाच गल्लीत अकरा कोरोना रुग्ण सापडल्याने गाव हॉटस्पॉट जाहीर करत प्रशासनाने तीन गल्लीत जाणारे रस्ते सील केले होते. पुढील आठ दिवसात रुग्ण संख्या ४१ झाली होती. या लॉकडाऊन दरम्यान आरोग्य, महसूल व पोलिस यंत्रणेवर मोठा ताण वाढला होता. दुसऱ्या टप्प्यात पोलिस अधिकारीसह सहा पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने ग्रामस्थांसह अन्य पोलिसांची धाकधूक अधिकच वाढली. यानंतर संपूर्ण गावात व मुख्य रस्त्यावर चमकणारे पोलिस कर्मचारी आता गायब झाले आहेत.दिवसभर गावात सायरन वाजवत गाजावाजा करणारे पोलिसांचे वाहन पाच-सहा दिवसापासून दिसेनासे झाले आहे.

पोलिस ठाण्यातील सात व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने ठाण्याचा आवार ओस पडला आहे. फिर्याद देण्याचे प्रमाणही कमी पडले आहे. सोमवारी (ता. ३) एका पोलिस कर्मचाऱ्याचे निधन झाल्याने अधिकच चिंता वाढली आहे. आज कामगार तलाठी कार्यालयातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने तिकडेही कुणीच फिरकताना दिसत नाही. पोलिस ठाणे व तलाठी कार्यालयाची पायरी नको रे बाबा... अशी अवस्था होवून बसली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The crime rate at Sonai police station in Newase taluka has come down