गुड न्यूज! पीक विम्यापोटी दोन कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात

मनोज जोशी
Thursday, 20 August 2020

शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा कपाशीचा पीक विमा मिळावा याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा दिली आहे.

कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्‍यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा कपाशीचा पीक विमा मिळावा याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देऊन 2019- 20 या वर्षाच्या कपाशी विम्याचे एक कोटी 86 लाख रुपये व 2018- 19 या वर्षाच्या ज्वारीच्या विम्याचे पाच लाख असे पिक विम्याचे एक कोटी 91 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्‍यातील दहेगाव बोलका, कोपरगाव, पोहेगाव, सुरेगाव व रवंदे या पाचही महसूल मंडलातील असंख्य शेतकऱ्यांनी मागील वर्षी 2019- 20 मध्ये कपाशीचा विमा भरलेला होता. या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी, यासाठी पाठपुरावा केला होता. 

त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन पिक विम्याची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये गेल्या वर्षीच्या कपाशी विम्याचे एक कोटी 86 लाख व 2018 च्या ज्वारी विम्याची पाच लाख 27 हजार असे एक कोटी 91 लाख 27 हजार रुपये पिक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

सर्व मंडलातील दोन हजार 350 शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना मागील महिन्यात 70 लाख रुपये ठिबक सिंचन अनुदान दिले असून हि रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात यापूर्वीच जमा झाली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop insurance deposit of Rs 2 crore on the account of farmers in Kopargaon taluka