अमरपूर परिसरात सलग पाच दिवस पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान

राजू घुगरे
Monday, 21 September 2020

चार- पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कपाशी, तूर, सोयाबीन या खरीप पिकांना फटका बसला आहे.

अमरापूर (अहमदनगर) : चार- पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कपाशी, तूर, सोयाबीन या खरीप पिकांना फटका बसला आहे. सखल भागातील अनेक पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हंगाम व त्यावरील खर्च वाया जाणार आहे.

यंदा जुनपासून तालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस असल्याने खरीप हंगामातील बाजरी, कपाशी, तूर, मूग, सोयाबीन, भुईमूग ही पिके जोमात होती. शेतक-यांनी या पिकांवर बियाणे, खते, फवारणी, खुरपणी, मशागत यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च ही केला आहे. चांगल्या नैसर्गिक वातावरणामुळे बहरात आलेल्या पिकांना मात्र वारंवार होणाऱ्या संततधार पावसाचा फटका बसला असून कपाशीची बोंडे काळी पडू लागली आहे. पातेगळ होऊ लागल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.खुप जास्तीचा पाऊस, सखल भागात साचलेले पाणी यामुळे सर्वच पिके सडू लागली आहेत. जमीनी उपळून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पावसाने आसू आणले आहेत.

बाजरीच्या काढणीचा हंगाम सध्या सुरू असून दोन तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून वाफसा नसल्याने शेतात पाऊल टाकणे अशक्य झाले आहे. त्यामुळे काढलेल्या बाजरीची कणसे खुडता येत नाहीत. शेतात चिखल असल्याने काढून पडलेल्या बाजरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जमिनीतील सततच्या ओलाव्यामुळे भुईमूगाला शेंगा लागलेल्या नाही. सोयाबिन काळी पडून सडली आहे. 

शहरटाकळी, भातकुडगाव, ढोरजळगाव, वाघोली परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे आटोकाट नुकसान झाले आहे. शेतक-यांनी पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crops damaged due to rains for five days in a row in Amarpur area