पावसामुळे शेवगाव तालुक्‍यातील पिकांचे नुकसान

सचिन सातपुते 
Friday, 16 October 2020

यंदा जूनपासून पावसाने थैमान घातले असून सुरूवातीला खरीपाच्या बाजरी, तूर, मूग, कपाशी, सोयाबीन या पिकांना अनुकूल असलेला पाऊस नंतर मात्र प्रतिकूल ठरला.

शेवगाव (अहमदनगर) : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे तालुक्‍यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले उत्पन्न पावसाने हिरावले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर, कांदा, ऊस पिकांचे डोळ्यासमोर होत असलेले नुकसान पाहून नको नको ना पावसा, असा धिंगाणा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
 
यंदा जूनपासून पावसाने थैमान घातले असून सुरूवातीला खरीपाच्या बाजरी, तूर, मूग, कपाशी, सोयाबीन या पिकांना अनुकूल असलेला पाऊस नंतर मात्र प्रतिकूल ठरला. चार महिन्यापासून पाऊस उघडीप देत नसल्याने सुरुवातीला मूग, बाजरीच्या पिकांना मोठा फटका बसला. आता शेतात सतत पाणी साचून कपाशी, तूर, कांदा ही पिके सडली आहेत. तर काढणीसाठी आलेले सोयाबीन शेंगा काळ्या पडून जागेवरच गळू लागल्या आहेत. वेचणीस आलेला कापूस पावसाने भिजून जमिनीवर पडू लागला आहे. वापसा नसल्याने वेचणी करता येत नसल्याने भिजून पिवळा तर कैऱ्या काळ्या पडल्या आहेत.
 
फुटलेल्या बोंडातील सरकीला मोड फुटू लागले आहेत. पातेगळ होऊन रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवर बियाणे, मशागत, फवारणी, खते यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला असून आता कमी अधिक प्रमाणात कापूस निघू लागला होता. मात्र, परतीचा पाऊस तीन दिवसांपासून प्रचंड प्रमाणात कोसळत असल्याने वेचणी लांबणीवर पडली आहे. भिजलेल्या कापसामुळे भावात ही घट येणार आहे. सोयाबीन शेंगा फुटून त्यांना कोंब फुटले तर तुरीचा बहार गळून गेला आहे.

खरीप पिकांची अतिवृष्टीमुळे ही वाताहत झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. नुकसानीचे पंचनामे सुरू असले तरी भरपाई कधी आणि किती प्रमाणात मिळेल याबाबत अजूनही साशंकता आहे. मात्र, पाऊस थांबत नसल्याने निदान पुढील पिकांचे तरी नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना नको नको ना रे पावसा असा धिंगाणा अवेळी असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

तालुक्‍यात मंडलनिहाय आतापर्यंत झालेला पाऊस 
शेवगाव -986.0, बोधेगाव - 980.0, चापडगाव - 1073.0, भातकुडगाव - 942.0, ढोरजळगाव - 835.0, एरंडगाव -573.0. 

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crops have been damaged due to rains in Shevgaon taluka