esakal | धक्कादायक! तर कृषी विद्यापीठच ठरू शकते कोरोना संसर्ग प्रसार केंद्र
sakal

बोलून बातमी शोधा

Crowd for corona inspection at Agricultural University covid Center in Rahuri

राहुरी कृषी विद्यापीठ येथील कोविड केअर सेंटरमध्ये रॅपिड अँटिजेन चाचणीसाठी सध्या गर्दी उसळत आहे.

धक्कादायक! तर कृषी विद्यापीठच ठरू शकते कोरोना संसर्ग प्रसार केंद्र

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राहुरी कृषी विद्यापीठ येथील कोविड केअर सेंटरमध्ये रॅपिड अँटिजेन चाचणीसाठी सध्या गर्दी उसळत आहे. या गर्दीत कोरोनाबाधित संशयित रुग्ण उभे असतात. सोशल डिस्टन्सिंग नाही, मास्क नाही, गर्दीच्या नियंत्रणासाठी एकही पोलिस कर्मचारी नाही. त्यामुळे कोविड केअर सेंटरच कोरोना संसर्ग झपाट्याने वाढण्यास अनुकूल ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महसूल प्रशासन वारंवार खबरदारीच्या उपाययोजना जाहीर करीत आहे. विविध निर्बंध लादले जात आहेत. त्याला पोलिस प्रशासनाची साथ मात्र कमी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. कृषी विद्यापीठ येथील कोविड केअर सेंटरमध्ये रॅपिड अँटिजेन चाचण्या केल्या जातात. त्यासाठी सकाळपासून नागरिकांची गर्दी असते. त्यांतील दहा- पंधरा जण तरी रोज बाधित आढळतात. नियम पाळण्यात येत नसल्याने, तेथून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

आरोग्य विभागाचे कर्मचारी जिवावर उदार होऊन, अत्यल्प साधनसामग्रीत रॅपिड अँटिजेन चाचण्या करीत आहेत. तहसीलदार फसियोद्दीन शेख यावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून असतात. मात्र, पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याची चर्चा आहे. चाचणीसाठी रांगेत उभ्या असलेल्या वृद्ध नागरिकांना पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था नाही. पोलिस नसल्याने सुरक्षा नियमही पाळले जात नाहीत.

कोरोना संकटाच्या काळात पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी नाकर्तेपणाची भूमिका बाजूला ठेवून संसर्ग रोखण्यासाठी महसूल प्रशासनाला साथ द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top