काँग्रेसच्या कार्यक्रमात मुसळधार पाऊस, आत कार्यकर्त्यांचा पूर

अमित आवारी
Sunday, 20 September 2020

ना. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी किरण काळे यांना नगर शहरातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेण्याची सुचना केली. त्यासाठी प्रशासनाच्या विविध स्तरावर बैठका लावण्यासाठी मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करेल असे सांगितले.

नगर : महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेल माझं कुटुंब, माझी जबाबदारी अभियान शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसने राबवण्याचा हाती घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातील प्रत्येक वॉर्डात जाऊन या अभियानाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

या अभियानाच्या शुभारंभासाठी आयोजित कार्यक्रमात ना.थोरात बोलत होते. माऊली सांस्कृतिक भवन या ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमाला आ. लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.कल्याणराव काळे, आ.सुभाषराव झांबड, नगर तालुकाध्यक्ष संपतराव मस्के आदींची यावेळी प्रमुख उपस्थित होती. 

थोरात म्हणाले की, कोरोना हे मानवतेवर आलेले संकट आहे. अशा काळात सामाजिक जाणिवेतून या अभियानाच्या आयोजनामुळे शासनाच्या कामाला शहरात काँग्रेसच्या माध्यमातून बळ मिळणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी जात जनजागृती करावी. या लढाईत लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना कोरोनाबाबतीत  लागणारी सर्वतोपरी मदत प्रशासनाशी समन्वय साधून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी. हे करताना कार्यकर्त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी.

किरण काळेंवर स्तुतीसुमने
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे कौतुक करताना ना. बाळासाहेब थोरात म्हणाले की, किरण काळे यांच्या निवडीला अवघा एकच महिना झाला आहे. असे असूनसुद्धा त्यांनी शहरात काँग्रेसला नवचैतन्य मिळवून देण्याचे काम केले आहे. ते शहरातील सामान्य घटकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत. संघर्ष करत आहेत. ते अभ्यासू आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पाठीशी युवाशक्ती आहे. शहरात काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. काळे यांच्या जनमानसात मिसळून काम करण्याच्या कार्यशैलीमुळे नगर शहराची जनता त्यांच्या पाठीशी निश्‍चितपणे उभी राहील, असा विश्वास यावेळी ना. थोरात यांनी व्यक्त केला.

प्रशासनासमवेत बैठका लावणार  
ना. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी किरण काळे यांना नगर शहरातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेण्याची सुचना केली. त्यासाठी प्रशासनाच्या विविध स्तरावर बैठका लावण्यासाठी मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करेल असे सांगितले.

पावसातही युवकांची मोठी उपस्थिती 
नगरसह राज्यात काँग्रेसला ओहटी लागली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून मंत्री थोरात यांनी राज्यात आणि किरण काळे यांनी नगर शहरात चैतन्य आणले आहे. त्यामुळे दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा जवळ येऊ लागले आहेत. कार्यक्रमाच्या वेळी अचानक शहराच्या विविध भागांमध्ये पाऊस सुरू झाला होता. असे असूनदेखील किरण काळे यांच्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या शहराच्या विविध भागातील युवकांनी भर पावसात अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. अनेक वर्षांनंतर या अभियानाच्या माध्यमातून किरण काळे यांच्या नेतृत्वात शहरातील काँग्रेसने कात टाकल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

यावेळी किरण काळे यांनी प्रास्ताविक करत अभियानाची संकल्पना मांडली. आ. लहू कानडे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांची यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन अन्वर सय्यद यांनी केले. आभार सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज लोंढे यांनी मानले. प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंगच्या  नियमांचे पालन करून आयोजित या कार्यक्रमाला काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds of activists at the Congress event