esakal | दुर्गम भागातील पर्यटनस्थळांवर जिल्ह्याबाहेरच्या पर्यटकांची गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

Crowds of tourists from outside the district at remote tourist destinations

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही राज्यातील मंदीरे, करमणूकीची इतर साधने बंद असल्याने शहरी भागातील पर्यटकांची पावले शेजारच्या जिल्ह्यातील दुर्लक्षित पर्यटनस्थळांकडे वळली आहेत.

दुर्गम भागातील पर्यटनस्थळांवर जिल्ह्याबाहेरच्या पर्यटकांची गर्दी

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही राज्यातील मंदीरे, करमणूकीची इतर साधने बंद असल्याने शहरी भागातील पर्यटकांची पावले शेजारच्या जिल्ह्यातील दुर्लक्षित पर्यटनस्थळांकडे वळली आहेत. अकोले व संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आजवर काहीशी उपेक्षित राहिलेली ठिकाणे पर्यटकांच्या गर्दीने गजबजली आहेत. परिसराची शांतता भंग होण्यासह अविघटनशील कचऱ्याचे ढीगही वाढत आहेत.

नगर जिल्ह्यातील शिर्डी, शनिशिंगणापूर आदी प्रसिध्द देवस्थाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरवातीपासून बंद केली आहेत. तसेच यात्रा, जत्रांवरही निर्बंध असल्याने, लॉकडाऊनच्या काळात मन मारुन घरात बसलेल्या मंडळींच्या पायाला अनलॉकच्या प्रक्रियेमुळे भिंगरी बांधली आहे. शासकिय सुट्टीचा दिवस व इतरही वेळी सहकुटूंब सहपरिवार भटकण्यासाठी बाहेर जाण्याकडे कल वाढला आहे. जिल्हाबंदी उठल्यामुळे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणे सोपे झाले आहे.

संगमनेर तालुका या दोन्ही महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने, या दोन्ही जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे, कल्याण आदी ठिकाणचे हौसे, नवसे संगमनेर व अकोले या निसर्गसमृध्द तालुक्यांकडे वळले आहेत. संगमनेर तालुक्यातील प्रसिध्द देवस्थानांमध्ये अद्यापही प्रवेश नाही. मात्र मध्यंतरीच्या काळातील अतिवृष्टीमुळे वाहते झालेल्या तालुक्यातील कळमजाई, चंदनापुरी घाटातील तामकडा, जोठेवाडी, मोरदरा, टाकेवाडी आदी ठिकाणचे दुर्लक्षित धबधबे व पेमगिरीचा प्रसिध्द वटवृक्ष, पेमगिरी किल्ला व धड रस्तेही नसलेल्या पर्यटनस्थळावर मुंबई, पुणे, हडपसर, कल्याण, नाशिक आदी ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. बाळेश्वर या निसर्गसमृध्द देवस्थान व वनविभागाच्या अखत्यारितील घनदाट जंगलाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र कोविड्च्या प्रादुर्भावामुळे बाळेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी मंदिरात प्रवेश बंदी केली आहे.

या पर्यटकांमध्ये दुचाकीवर येणारी युवक, युवती मोठ्या वाहनातून येणारी कुटूंबे यांच्या वर्दळीने निसर्गसंपन्न परिसर दणाणतो आहे. धोका पत्करुन चालवलेल्या सुसाट बाईक, अनोळखी पायवाटा व जंगलातील भटकंती, धबधब्याच्या शेवाळलेल्या दगडांवर चाललेला धिंगाणा शांतता नष्ट करीत आहे.

पिण्याच्या पाणी व शितपेयांट्या प्लॅस्टीकच्या रिकाम्या बाटल्या, फास्ट फुडच्या पिशव्या, थर्माकोल व प्लॅस्टीकच्या पत्रावळ्या, ग्लास, द्रोण यांचा कचरा निर्माण होत आहे. या आगंतुक पर्यटकांचा स्थानिक दुकानदारांना फारसा लाभ होत नाही. कोणतेही निर्बंध नसलेल्या पेमगिरी गडावरही युवकांचा जल्लोष सुरु असल्याचे दिसते. कोरोना बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या या पर्यटकांना मास्क, फिजीकल डिस्टंसचे भान नसते. त्यामुळे या कोरोनापासून दूर राहिलेल्या ठीकाणी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 

बाळेश्वर देवस्थानचे विश्वस्त रंगनाथ फटांगरे व सुनिल घुले म्हणाले, कोरोना प्रादुर्भावापासून बाळेश्वर देवस्थानात पर्यटकांना प्रवेश बंदी केली आहे. त्यासाठी दर दिवशी देवस्थान विश्वस्त मंडळातील दोन सदस्य पूर्णवेळ सेवा देतात. अशा निर्जन ठिकाणी येणाऱ्या आगंतुक प्रेमी युगुलांना परत पाठवताना वादही होतात.  

संपादन : अशोक मुरुमकर