बंधाऱ्याचा भराव फुटून शेतीचे नुकसान; पंचनामे करण्याच्या सूचना

मनोज जोशी
Saturday, 19 September 2020

टाकळी येथे बंधाऱ्याचा भराव फुटून या बंधाऱ्यातील पाणी लगतच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान झाले आहे.

कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्यातील टाकळी येथे बंधाऱ्याचा भराव फुटून या बंधाऱ्यातील पाणी लगतच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या घटनेची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना दिल्या आहेत. 

शुक्रवारी (ता. 18) रात्री टाकळी येथील दगडी साठा बंधारा फुटल्यामुळे बंधाऱ्यालगत असलेल्या शेतात पाणी शिरून बाजरी, सोयाबीन, मका आदी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होवून कांदा चाळीत पाणी शिरल्यामुळे कांद्याचे देखील नुकसान झाले आहे. चालू वर्षी जून महिन्यापासून पाऊस पडत आहे. कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे. अशा परिस्थितीतून शेतकरी जात असतांना टाकळी साठवण बंधाऱ्याचा भराव वाहून फुटल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

बंधाऱ्याचा भराव फुटल्याने या बंधाऱ्यातील पाणी कमी करून होणारे नुकसान कमीत व्हावे यासाठी या बंधाऱ्याचे लोखंडी गेट उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र लोखंडी गेट उघडले गेले नाही. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे झालेल्या नुकसानीचे बारकाईने पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव तयार करावे व भविष्यात या बंधाऱ्यात पाणी साठले जावे यासाठी या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करा अशा सूचना आमदार काळे यांनी केल्या आहेत. यावेळी सभापती पौर्णिमा जगधने, काळे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, उपअभियंता उत्तम पवार आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to agriculture due to bursting of embankment