वर्षभर सांभाळलेला ९० हेक्टर ऊस आर्धातास झालेल्या वादळी वार्‍यासह पावासाने जमीनदोस्त

सुनील गर्जे
Sunday, 6 September 2020

अर्धातास झालेल्या सुसाट वादळी वार्‍यासह पावसाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नेवासे (अहमदनगर) : तालुक्याच्या पूर्व व दक्षिण भागात अर्धातास झालेल्या सुसाट वादळी वार्‍यासह पावसाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात सुमारे ८० ते ९० हेक्टर ऊस जमीनदोस्त झाल्याने ऊस कुजून नुकसान होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

नेवासे तालुक्यातील उसाचे आगार म्हणून समजले जाणार्‍या तेलकुडगाव, देवसडे, चिलेखनवाडी, जेउर हैबती, देडगाव यागावांसह शिवारात शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी अचानक आलेल्या सुसाट्याच्या वार्‍यासह पावसाने काही मिनिटातच उभा ऊस जमीनदोस्त केले. या भागाची पहाणी केली असता या वादळीवार्‍यासह पावसाचे सर्वाधिक नुकसान तेलकुडगाव व देवसडे या दोन गावांच्या ऊस पिकांचे झाले आहे. जेऊर हैबती, देवसडे, देडगाव याभागात कपाशीबरोबरच केळीचे झाडे पडल्याने काही नुकसान झाले आहे.

साखर कारखाने सुरू होण्याआगोदरच तोडीला आलेला ऊस पूर्णतः जमीनदोस्त झाल्याने ऊस तोडणीअभावी कुजण्याची तसेच उंदीर, घुशींच्या उपद्रवांमुळे नुकसान होण्याची भीती ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडुन व्यक्त होत आहे.

वादळी वार्‍याने ऊस पडल्याने माझ्यासह मोठे नुकसान झाले आहे. पावसाने नुकसान झालेल्या क्षेत्रातील जवळील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू होताच तोडणीसाठी सर्वप्रथम पाडलेल्या उसाला प्राधान्य द्यावा. जेणेकरून शेतकर्‍यांचे नुकसान टळेल, असे देवसडे येथील शेतकरी बबनराव पिसोटे यांनी सांगितले.

उसाला नुकसान भरपाई मिळत नसलीतरी कृषि विभागाने पाडलेल्या ऊसाची पहाणी करून त्याचा आहवाल साखर कारखान्यांना द्यावा. त्यामुळे नुकसान झालेले क्षेत्र लक्षात येवून उसाला प्रथम तोड मिळेले. 
- मकरंद राजहंस, ऊस, तूर उत्पादक शेतकरी, तेलकुडगाव 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to agriculture due to Telkudgaon storm in Nevasa taluka