दुपारी ४ वाजता ढग फुटला!; वर्षभराची कमाई चार तासात कमाई 

शांताराम जाधव
Sunday, 20 September 2020

पठार भागात ढगफुटीसदृश्य पाऊस... शेतमालांचे प्रचंड नुकसान... राज्यातील हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी संगमनेर तालुक्याच्या पठार भागात दुपारी ४ वाजता सुरू झालेला ढगफुटीसदृश्य पाऊस सलग चार तासानंतरही कोसळत होता. 

बोटा (अहमदनगर) : पठार भागात ढगफुटीसदृश्य पाऊस... शेतमालांचे प्रचंड नुकसान... राज्यातील हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी संगमनेर तालुक्याच्या पठार भागात दुपारी ४ वाजता सुरू झालेला ढगफुटीसदृश्य पाऊस सलग चार तासानंतरही कोसळत होता. परिणामी शेतमालांचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजाला डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. 

शनिवारी दुपारी चार वाजता सुरू झालेल्या पावसाने बोटासह आंबी दुमाला, घारगाव, अकलापूर येथील शेतांना तळ्यांचे स्वरूप आले. भोजदरी', वनकुटे, कोठे या गावातील ओढेनाले दुथडी भरून वाहत होते. परिसरातील बाजरी, मका, मुग, मिरची यांचे नुकसान झाले आहे. जांबुत, हिवरगाव पठार, साकूर येथे दोन गावांना जोडणारे पूल पाण्याखाली आले. शेतात पाणी साचल्याने कांदा रोपांची नासाडी झाली.सोयाबीन पिकांची पाने काळवंडली. मांडवे, शिंदोडी या परिसरात कापसांच्या पिकांचे नुकसान झाले. 

माऊली, डोळासणे, कर्जुले पठार या गावातील शेतमालांचे अतोनात नुकसान झाले आहे. सारोळे पठार, जवळे बाळेश्वर, सावरगाव घुले येथे धान्यपिकांसह फळ बागांचेही नुकसान झाले.

तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी पठार भागातील सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.

संपादन :अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to agriculture due to torrential rains in Ahmednagar district