esakal | वादळात सापडला सातारा, सह्याद्रीमुळे टळला नगरवरचा फेरा
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to Ahmednagar avoided due to Sahyadri

विशाखापट्टणमपासून निघालेले हे भयंकर चक्रीवादळ महाविनाश घडवित हैदराबाद, कर्नाटक व सोलापूरमार्गे महाराष्ट्रात घुसले. मार्ग बदलल्याने नगर जिल्ह्यातील त्याचे आगमन थोडक्‍यात हुकले. त्याने मार्ग बदलला नसता, तर नगर, शिरूर ते मुंबईपर्यंतच्या वादळाच्या प्रवासात मोठा उत्पात घडला असता.

वादळात सापडला सातारा, सह्याद्रीमुळे टळला नगरवरचा फेरा

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा प्रचंड साठा सोबत घेऊन महाविनाश घडवित, अरबी समुद्राकडे वेगाने झेपावत निघालेले चक्रीवादळ काल (ता.14) महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दणकट डोंगररांगांनी अडविले. तेथेच त्याचे रूद्र रौप मावळले.

वाटेत डोंगररांगा आडव्या आल्याने त्याचा वेग मंदावला. पुढचा मार्गही खुंटला. त्यामुळे ते सातारा व वडुज परिसरातच 12 ते 15 तास रेंगाळले. आता थंडावलेले हे वादळ सह्याद्रीच्या डोंगररांगा पार करीत, पहाटे अरबी समुद्रात प्रवेश करील. या अस्मानी संकटापासून नगर जिल्हा थोडक्‍यात बचावला. गेल्या दोन दिवसांत हवामान खात्याच्या संकेतस्थळावर हे नाट्य पाहायला मिळाले. 

विशाखापट्टणमपासून निघालेले हे भयंकर चक्रीवादळ महाविनाश घडवित हैदराबाद, कर्नाटक व सोलापूरमार्गे महाराष्ट्रात घुसले. मार्ग बदलल्याने नगर जिल्ह्यातील त्याचे आगमन थोडक्‍यात हुकले. त्याने मार्ग बदलला नसता, तर नगर, शिरूर ते मुंबईपर्यंतच्या वादळाच्या प्रवासात मोठा उत्पात घडला असता.

सुदैवाने ते थोडे दक्षिणेकडे सरकले. कोयना परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगावर आदळले. त्यातून काल (बुधवारी) मध्यरात्री एका अर्थाने त्याची अखेर झाली. त्याची विनाशकारी शक्ती सह्याद्रीने नष्ट केली. सह्याद्रीच्या कृपेने नगर, शिरूर व मुंबईचे मोठे नुकसान टळले. मात्र, सातारा व वडुज परिसरात 15 तास रेंगाळल्याने तेथे जोराचा पाऊस व मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली. 

विशाखापट्टणम, हैदराबाद, कर्नाटक ते सोलापूर या प्रवासात त्याला कोठेही अडथळा आला नव्हता. त्यामुळे त्याचा चक्राकार वेग ताशी 25 किलोमीटरपर्यंत कायम होता. त्याच्या मार्गापासून चारही दिशेला 100-150 किलोमीटरपर्यंत ढगफुटीसदृश्‍य वादळी पाऊस झाल्याने हाहाकार उडाला.

सातारा व वडुजपर्यंत वेगात आलेल्या चक्रीवादळाला सह्याद्रीचा गतीरोध निर्माण झाला. त्याचा ताशी 25 किलोमीटर असलेला वेग, निम्म्याने कमी झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता हे काहीसे शांत झालेले वादळ कोयना पाणलोट क्षेत्रातून डोंगर ओलांडत प्रतापगड, चिपळूणमार्गे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहाकर परिसरातून उद्या पहाटे अरबी समुद्रात ओमेनच्या दिशेने रवाना होईल. 

तीन दिवसांत वातावरण स्वच्छ 
जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ म्हणाले, की हे चक्रीवादळ कोयना परिसरात सह्याद्रीच्या डोंगररांगावर आदळल्याने त्याचा वेग मंदावला. त्यामुळे उर्वरित नगर, पुणे व मुंबई शहराचे फार मोठे नुकसान वाचले. सह्याद्रीने या भागावर कृपा केली, असेच म्हणावे लागेल. पुढील तीन दिवसांनंतर आता वातावरण स्वच्छ व्हायला सुरवात होईल. 

संपादन - अशोक निंबाळकर