तीन तास जोरदार पाऊस झाला; शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास...

शांताराम जाधव
Friday, 4 September 2020

पूर्वा हत्ती नक्षत्राच्या पावसाने संगमनेर तालुक्यातील पठार भागात शेतीमालाचे नुकसान झाले आहे.

बोटा (अहमदनगर) : पूर्वा हत्ती नक्षत्राच्या पावसाने संगमनेर तालुक्यातील पठार भागात शेतीमालाचे नुकसान झाले आहे. गुरूवारी (ता. ३) दुपारी चारनंतर सुरू झालेल्या पावसाने पठार भागातील बोटा, आंबी दुमाला, भोजदरी, म्हसवंडी, अकलापूर गावांमध्ये सलग तीन तास जोरदार हजेरी लावली. सात वाजता वीजांचा कडकडाटसह पाऊस सुरू होता. 

बोटा परिसरात साठ टक्के बाजरीची लागवड झाली असून सध्या कणसांच्या तोडणीचा हंगाम सुरू आहे. बाजरीचे मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता आहे. कुरकुटवाडीतील डाळींबाच्या काही बागांमध्ये पाणी साचले आहे. याबरोबर मका, सोयाबीन, झेंडू, टोमॅटोलाही पावसाचा फटका बसला आहे.

साकूर, जांबुत, हिवरगाव पठार, मांडवे भागात मध्यम स्वरूपात पाऊस पडल्याने नुकसान टळले. तर घारगाव, माळेगाव पठार, डोळासणे, कर्जुलेपठार येथील कांदा रोपे अडचणीत आली आहेत. सारोळेपठार, वरूडीपठार, जवळे बाळेश्वर, पोखरी बाळेश्वर पट्ट्यात दोन तास पावसाने हजेरी लावली. या नक्षत्राच्या पावसाचा असाच जोर राहिला तर पठार भागातील बाजरीच्या पिकांचे पन्नास टक्के नुकसान नक्कीच होईल, अशी शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to crops due to heavy rains in Botha area of ​​Sangamner taluka