esakal | हाता- तोंडाशी आलेला घास गेला; बाजरी, सोयाबीन, कांदा पाण्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to crops due to heavy rains in Rahuri taluka

तीन महिन्यांपासून सुरू असलेला संततधार पाऊस. सरासरीच्या दुपटीपेक्षा जास्त कोसळलेला पाऊस. तीन दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी.

हाता- तोंडाशी आलेला घास गेला; बाजरी, सोयाबीन, कांदा पाण्यात

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : तालुक्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेला संततधार पाऊस. सरासरीच्या दुपटीपेक्षा जास्त कोसळलेला पाऊस. तीन दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी. ओढ्या- नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने धोक्यात आलेली खरिपाची पिके. अशा ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत आहे. त्यामुळे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचे आदेश दिले.

शुक्रवारी (ता. १९) तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आंबी येथे समक्ष पाहणी करून महसूल विभागाला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचा आदेश दिला. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

तालुक्यात जूनमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पेरण्या झाल्या. बाजरी, सोयाबीन पिथे काढणीला आले. परंतु, अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले. ओढे- नाले तुडुंब भरून वाहत असल्याने, त्यांचे पाणी शेतात शिरले. कपाशी, सोयाबीन, मका, भुईमूग, कांदा रोपासह चारा पिके, फळबागांचे अतोनात नुकसान झाले. आंबी- देवळाली प्रवरा रस्ता, तांभेरे- सोनगाव- सात्रळ रस्ता पाण्याखाली गेला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. फळबागांचे यापूर्वी पंचनामे करण्यात आले. परंतु, त्यांना अद्याप मदत जाहीर झालेली नाही.

तालुक्यात अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. खरीपाची पिके पाण्यावर तरंगत आहेत. भाजीपाल्याची पिके सडली आहेत. शासनाने पिकांचे पंचनामे करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. अशी शेतकरी मागणी करीत होते. पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी आंबी येथे समक्ष नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या पथकातर्फे पंचनामे केले जातील. 
- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी
 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image