
आजच्या अवकाळी पावसाने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिरिक्त बुरशीनाशकांच्या फवारणीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
नेवासे : दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणाचा परिणासम पिकांवर होत आहे. सोमवार (ता. 14) रोजी नेवासे तालुक्यात झालेला रिमझिम पावसाने रब्बी पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसाने कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पाडली.
तालुक्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह नेवासे शहर, नेवासे बुद्रुक, भेंडे, कुकाणे, सलाबतपुरे, पानेगाव, तरवडी, शिरसगाव, प्रवरसंगम, बेलपिंपळगाव, वडाळा बहिरोबा, सोनईसह तालुक्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. अवकाळी पावसाने रोग व किडीचा रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.
आजच्या अवकाळी पावसाने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिरिक्त बुरशीनाशकांच्या फवारणीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
ढगाळ वातावरणात व तुरळक अवकाळी पावसातही शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरूच होते. या अवकाळी पावसाचा गहू, हरभरा, ज्वारी, फळे, आंब्याच्या मोहर, भाजीपाला यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
तर गळीत हंगाम लांबले : शेवाळे
नेवासे तालुक्यातील ज्ञानेश्वर व मुळा हे दोन्ही साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरळीत व पूर्ण क्षमतेने सुरू आहे. मात्र, सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे उसतोडीचा अडथळा येऊ शकतो. दरम्यान, आणखी जोराचा पाऊस झाल्यास गळीत हंगामात अडथळा व विस्कळीतपणा येण्याची शक्यता आहे. परिणामी गळीत हंगामाचा कालावधीही लांबू शकतो, अशी भीती अनिल शेवाळे यांनी व्यक्त केली.
"पुढील चार-पाच दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केल्याचा संदेश सोशल मीडियावर येत असल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे. यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.
- दत्तात्रेय देवढे, प्रगतशील शेतकरी, कुकाणे, ता. नेवासे, अहमदनगर