अजबच! लॉकडाउनपासून सोनईत पिंडाला कावळा शिवेना, दशक्रियाविधी इतरत्र हलवले

विनायक दरंदले
Tuesday, 27 October 2020

लाॅकडाऊनच्या सात महिन्यात शंभरहून अधिक व्यक्तींचे निधन झाले. पैकी निम्म्याहून अधिक कुटुंबांनी कावळा शिवत नसल्याने टोका येथे जावून विधी केला आहे. 

सोनई : सोनई येथील दशक्रियाविधी ओट्यावरचा मुक्काम कावळ्यांनी हलवला असल्याने ग्रामस्थांसमोर पिंडाला कावळा शिवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कावळ्यांच्या या लाॅकडाऊनमुळे येथील विधी अन्यत्र होवू लागले आहेत.

अतिशय गजबजलेल्या ठिकाणी दशक्रियाविधी ओटा असतानाही येथे पूर्वी विधी सुरु असतानाच पिंडाला कावळा शिवत होता. यामुळे येथे गावातील व परीसरातील ग्रामस्थ विधी करत होते. येथे यशवंत प्रतिष्ठान, ग्रामपंचायत व सोनई वाहन मेळाव्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व सुविधा करण्यात आलेल्या आहेत. येथील कावळ्यांनी आपला मुक्काम अन्यत्र हलविल्याने ग्रामस्थ आता प्रवरासंगम (टोका) येथे विधी करू लागले आहेत.

येथील ओट्यावर भाडोत्री वाहने लागतात. झाडावर बसलेले कावळे व इतर पक्षी वाहनावर घाण करत असल्याने चालक गलोलचा वापर करुन पक्षांना
हाकलून लावतात आणि यामुळेच येथील कावळ्यांनी आपला मुक्काम हलविला असल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे.

लाॅकडाऊनच्या सात महिन्यात शंभरहून अधिक व्यक्तींचे निधन झाले. पैकी निम्म्याहून अधिक कुटुंबांनी कावळा शिवत नसल्याने टोका येथे जावून विधी केला आहे. अहमदनगर

 

बसस्थानकामागील आमरधाम येथे दशक्रिया विधीची सुविधा ग्रामपंचायतीने सुरु केल्यास ग्रामस्थांचा प्रश्न सुटेल. हा परीसर गावापासून बाहेर असल्याने अन्य अडचण येणार नाही.
- बापुसाहेब बारगळ, ग्रामस्थ.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Dashakriya ritual in Sonai was taken to Kayagaon Toka