ॲम्ब्युलन्समधून भर रस्त्यावर प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेला पडला मृतदेह अन्‌... 

अमित आवारी
Wednesday, 22 July 2020

कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत असतानाच मंगळवारी (ता. २१) सायंकाळी चारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर महापालिकेच्या शववाहिनीतून, प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळलेला मृतदेह स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला.

नगर : कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत असतानाच मंगळवारी (ता. २१) सायंकाळी चारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर महापालिकेच्या शववाहिनीतून, प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळलेला मृतदेह स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला. हा मृतदेह कोरोनाबाधित रुग्णाचा असल्याची चर्चा होती. मात्र, महापालिका प्रशासनाने तो बेवारस असल्याचे सांगितले आहे.

जिल्हा रुग्णालयातून मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास एकाचा मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत "सील'बंद करून महापालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतदेह घेऊन शववाहिनी नालेगावातील अमरधामच्या दिशेने निघाली. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून रस्त्यावर येताच, शववाहिनीच्या मागील दरवाजाची कडी निघून स्ट्रेचरसह मृतदेह रस्त्यावर आदळला. हा प्रकार लक्षात येताच, रस्त्याने ये- जा करणाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. चालकाने शववाहिका थांबविली. इतर कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील वाहतूक थांबवून, प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेला मृतदेह पुन्हा शववाहिनीत ठेवला. शववाहिनी गेल्यावर वाहतूक पूर्ववत झाली.

कोरोनाबाधित मृताची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर आहे. मात्र, त्यांच्याकडून मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याची चर्चा आहे. महापालिका प्रशासनाकडे मागील 10- 12 वर्षांपासून एकच शववाहिका आहे. ती नादुरुस्त असल्याचा अहवाल कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी वरिष्ठांना दिला आहे; मात्र तरीही महापालिका प्रशासनाने नवीन शववाहिनी घेतली नसल्याचे समजते.

वरिष्ठांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍न चिन्ह
राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर म्हणाले, महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार ढिसाळ आहे. डॉ. अनिल बोरगे यांच्यामुळे महापालिका व शहराची प्रतिमा मलिन होते आहे. त्यांची अनेक प्रकरणे पुढे येऊनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

कर्मचाऱ्यांना निलंबित करु नका तर...
शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, महापालिका आयुक्‍त व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना घनकचऱ्याच्या बिलाव्यतिरिक्‍त काहीही दिसत नाही. कोविड कामाच्या नावाखाली नागरी समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यापेक्षा, नवीन शववाहिनी खरेदी करा. नवीन वाहन खरेदी न करणारे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावरच कारवाई करा.

बेवारस व्यक्तीचा मृतदेह
महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे म्हणाले, महापालिका प्रशासनाने मृतदेहाच्या विल्हेवाटीचा ठेका एका एजन्सीला दिला आहे. रस्त्यावर पडलेला मृतदेह कोरोनाबाधिताचा नव्हता. तो बेवारस व्यक्तीचा मृतदेह होता. कोरोना संकटामुळे आता सर्वच मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत "सील'बंद केले जातात. हा मृतदेह बेवारस असल्यामुळे त्याचे दफन वारुळाचा मारुती परिसरात करण्यात आले.
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead body wrapped in plastic from a ambulance fell on the street