शेतीच्या बांधाच्या वादाने घेतला शेतकऱ्याचा जीव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

वाद विकोपाला जाऊन आरोपी भूपेंद्र याने दत्तात्रेय ठोंबरे यांच्या डोक्‍यात धारदार कुऱ्हाडीचा घाव घातला. घाव वर्मी बसल्याने ठोंबरे जागीच कोसळले.

नेवासे : शेतीच्या बांधावरील रस्त्याच्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून शेतकऱ्याचा खून केल्याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दत्तात्रेय लक्ष्मण ठोंबरे (वय 42, रा. गोधेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

दरम्यान, याबाबत ज्ञानेश्वर लक्ष्मण ठोंबरे यांनी नेवासे पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, भूपेंद्र महेंद्र भिंगारदे, अक्षय महेंद्र भिगारदे, महेंद्र गुलाबराव भिंगारदे, कोमल धर्मराज भिंगारदे, राजेंद्र वसंतराव भिंगारदे (सर्व रा. गोधेगाव) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. सर्व आरोपी पसार झाले आहेत.

गोधेगाव शिवारात दत्तात्रेय ठोंबरे व महेश भिंगारदे यांची शेती व वस्ती शेजारी शेजारी आहे. वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच भिंगारदे यांनी मुरमाचा ढीग टाकला होता. त्याचा रहदारीस अडथळा येत असल्याने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ठोंबरे बंधू हा मुरूम रस्त्यावर पसरवित होते. त्यावेळी वरील आरोपींनी तेथे येऊन ठोंबरे यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली.

वाद विकोपाला जाऊन आरोपी भूपेंद्र याने दत्तात्रेय ठोंबरे यांच्या डोक्‍यात धारदार कुऱ्हाडीचा घाव घातला. घाव वर्मी बसल्याने ठोंबरे जागीच कोसळले. त्यांना तातडीने नगर येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले.

दरम्यान, या घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले. जिल्हा रुग्णालयात उत्तरिय तपासणी झाल्यावर आज सायंकाळी गोधेगाव येथे ठोंबरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विनय ठाकूर यांच्यासह जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a farmer due to a dispute over a farm dam