
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता. 24) रात्री नऊच्या सुमारास घुलेवाडी शिवारातील संजीवन रुग्णालयात कोवीडवर उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमले होते.
संगमनेर (अहमदनगर) : कोविडच्या प्रादुर्भाव काळात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या पहिल्या खासगी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याने, रुग्णालय प्रशासन व नातेवाईकांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. याप्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यात डॉ. स्वप्निल भालके (रा. गुंजाळवाडी शिवार, संगमनेर) व समीर शेख (रा, हसनापूर, ता, राहाता) यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरुन दोन्ही गटातील 25 जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता. 24) रात्री नऊच्या सुमारास घुलेवाडी शिवारातील संजीवन रुग्णालयात कोवीडवर उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमले होते. त्यातील काहींनी डॉक्टरांना कृत्रिम श्वसन यंत्रणा बंद केल्याचा जाब विचारीत डॉ. स्वप्नील भालके व डॉ. जगदिश वाबळे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच डॉ. भालके यांचा मोबाईलही हिसकावून घेतला. यावेळी जमलेल्या अन्य मंडळींनी रुग्णालयातील साधनसामुग्रीची तोडफोड करीत मोठे नुकसान केले.
याप्रकरणी डॉ. स्वप्नील भालके यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आठ ते दहा जणांविरोधात मारहाण, तोडफोड व दंगलीचा गुन्हा दाखल केला. तर मयत रुग्णाते नातेवाईक समीर शेख लालशेख यांनी संजीवन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदिश वाबळे व अन्य दहा ते पंधरा जणांविरोधात तक्रार दाखल केली.
त्यात म्हटले आहे की, रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉ. वाबळे यांनी प्रेत ताब्यात देण्यापूर्वी दिड लाख रुपये बील भरण्यास सांगत आम्हाला रुग्णालयाबाहेर काढून दिले. तसेच दहा ते पंधरा जणांचा जमाव जमवून फिर्यादी व साक्षीदारांना लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले व फिर्यादीच्या जीपचेही नुकसान केले. य़ा फिर्यादीवरुन डॉ. जगदिश वाबळे व अन्य दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींविरोधात आज पहाटे अडीच वाजता मारहाण, तोडफोड व दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत.
संपादन : सुस्मिता वडतिले