पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह वाहुन गेलेल्या व्यक्तीचा झुडपात मृतदेह सापडला

मार्तंड बुचुडे 
Tuesday, 22 September 2020

हंगा नदीच्या पुराच्या पाण्यात सोमवारी (ता. 21) सायंकाळी सहा वाजणेच्या सुमारास मुंगशी येथील वाहून गेलेल्या दत्तात्रय दिनकर थोरात (वय 52 ) यांचा मृतदेह मंगळवारी (ता. 22) सकाळी ७ वाजणेच्या समुरास तब्बल 12 तासांनतर आढळून आला.

पारनेर (अहमदनगर) : हंगा नदीच्या पुराच्या पाण्यात सोमवारी (ता. 21) सायंकाळी सहा वाजणेच्या सुमारास मुंगशी येथील वाहून गेलेल्या दत्तात्रय दिनकर थोरात (वय 52 ) यांचा मृतदेह मंगळवारी (ता. 22) सकाळी ७ वाजणेच्या समुरास तब्बल 12 तासांनतर आढळून आला. 

ज्या पुलावरून थोरात दुचाकीसह वाहून गेले तेथून सुमारे एक किलोमिटरवर त्यांचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी सकाळी स्थानिक तरूणांच्या सहकार्याने पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली. त्यावेळी थोरात यांचा मृतदेह एका झुडपाला अडकलेला सापडला.

सोमवारी पारनेरसह मुंगशी, लोणी, हवेली व हंगे परीसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे हंगा नदीला अनेक वर्षानंतर अतीशय मोठा पूर आला होता. सोमवारी सायंकाळी थोरात हे हंगे येथून आपल्या दुचाकीवरून घरी मुंगशी येथे सायंकाळी सहा वाजणेच्या सुमारास जात असताना ते हंगा  नदीच्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेले होते.
हंगे ते मुंगशी या रस्त्यावर मुंगशी गावाजवळ असलेल्या पुलावर पुराचे खूप पाणी होते.

थोरात हे घरी या पुलावरून जात असताना त्यांना या वेळी पाण्याचा आंदाज न आल्याने त्यांनी आपली दुचाकी पाण्यात घातली. ते पुलाच्या मध्यावर गेले असताना दुचाकीसह वाहून गेले. दुचाकी पुलाच्या जवळच झाडाच्या एका झुडपाला अडकली. मात्र थोरात दूर वाहात गेले. ही घटना समजल्यानंतर रात्रीच सुप्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. मात्र त्यावेळी अंधार झाल्याने व नदीला पाणीही भरपूर असल्याने रात्री शोध घेणे कठीण झाले. 

शेवटी आज सकाळी हवालदार साहेबराव ओहळ यांनी कैलास थोरात, जालींदर थोरात, सुदाम थोरात,  य़शवंत थोरात, विलास थोरात, अशोक थोरात, मच्छींद्र थोरात, भास्कर थोरात, गणेश दळवी, पाडूरंग शिंगोटे आदी तरूणाच्या मदतीने शोध कार्य सुरू केले. पुलापासून एक किलोमिटरवर त्यांचा मृतदेह झुडपांमध्ये अडकलेला अढळून आला. त्यानंतर तो मृतदेह तरूणांच्या साह्याने नदी पात्रातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पारनेर येथे पाठविण्यात आला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a person drowned in Hanga river in Parner taluka