रेशनसाठी मास्क लावणे बंधनकारक; नो मास्क, नो रेशनचा निर्णय

गौरव साळुंके
Tuesday, 6 October 2020

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विनामास्क असलेल्या ग्राहकांना आता स्वस्त धान्य दुकानात रेशन मिळणार नाही.

श्रीरामपुर (अहमदनगर) : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विनामास्क असलेल्या ग्राहकांना आता स्वस्त धान्य दुकानात रेशन मिळणार नाही. रेशनसाठी चेहरयाला मास्क लावणे बंधनकारण करण्यात आले आहे. तुम्ही जर स्वस्त धान्य खरेदीसाठी विना मास्कचे जाणार असाल तर रिकाम्या हाताने माघारी परतावे लागणार आहेत. 

जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने नो मास्क, नो रेशन, असा निर्णय घेण्यात आल्याची माहीती संघटने जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असुन स्वस्त धान्य दुकान चालकही आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. श्रीरामपुर, कोपरगाव, नेवासा, संगमनेर, राहुरी, पाथर्डी येथील दुककानदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. 

अनेक जण उपचारानंतर बरे होवुन घरी परतले. परंतू अद्याप अनेक दुकानदारांवर उपचार सुरु आहे. रेशन दुकानातुन धान्याचे वाटप करताना अनेक नागरीक संपर्कात येतात. कार्डधारकाचा अंगठा पाॅज मशिनवर ठेवावा लागतो. अनेक ग्राहक विना मास्क धान्य खरेदीसाठी दुकानात येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची अधिक शक्यता असते. ग्राहकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घेत धान्य खरेदीसाठी चेहरयाला मास्क लावावा. 

विना मास्कच्या ग्राहकांना स्वस्त धान्याचे वाटप होणार नसुन त्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागणार आहे. कोरोनाच्या संकटात पुढील काळात नो मास्क नो रेशन संकल्पना सर्व दुकानदार राबविणार असुन ग्राहकांनी प्रतिसाद देत धान्य खरेदीसाठी मास्क लावण्याचे अवाहन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, सचिव रज्जाक पठाण, चंद्रकांत झुरंगे, विश्वास जाधव, बाळासाहेब दिघे, सुरेश उभेदळ, ज्ञानेश्वर वहाडणे, गणपत भांगरे यांनी केले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision of District Swast dhanya dukan Association to give grain without mask