कांद्याबाबत दोन दिवसांत निर्णय, मंत्री गोयल यांचे विखे पाटलांना आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

शेतकऱ्यांकडे मार्च, एप्रिलमध्ये उत्पादित केलेला उन्हाळी कांदा हाच एक आशेचा किरण उरला आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नगर, नाशिक जिल्ह्यांत विक्रमी कांदाउत्पादन झाले आहे. ग्राहकांचे हित साधतानाच शेतकऱ्यांवर अन्यायही होता कामा नये.

नगर ः ""केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होण्याचा धोका आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बाजारातील कांदापुरवठा सुरळीत व भाव आटोक्‍यात राहणे आवश्‍यक आहे.

गरज पडल्यास केंद्र सरकारने "नाफेड'मार्फत खरेदी केलेला एक लाख क्विंटल कांदा बाजारात आणून किमती स्थिर कराव्यात,'' अशी आग्रही मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. 

मंत्री गोयल यांनी, याबाबत सकारात्मक विचार करून दोन दिवसांत शेतकरीहिताचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, की महाराष्ट्रातील शेतकरी आधीच कोरोना, अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांकडे मार्च, एप्रिलमध्ये उत्पादित केलेला उन्हाळी कांदा हाच एक आशेचा किरण उरला आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नगर, नाशिक जिल्ह्यांत विक्रमी कांदाउत्पादन झाले आहे. ग्राहकांचे हित साधतानाच शेतकऱ्यांवर अन्यायही होता कामा नये, अशी मागणी डॉ. विखे पाटील यांनी केली. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहनही डॉ. विखे पाटील यांनी केले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision on onion in two days, Minister Goyal assures Vikhe Patil