वेतन आयोगाबाबत दोन- तीन दिवसात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

विलास कुलकर्णी
Wednesday, 28 October 2020

कृषी विद्यापीठातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा.

राहुरी (अहमदनगर) : कृषी विद्यापीठातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू कण्यासाठी, तसेच तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील समन्वय संघाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत प्रशासकीय इमारतीसमोर दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन करण्यात आले. 

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांना विद्यापीठ समन्वय संघातर्फे निवेदन देण्यात आले. कुलसचिव वाघ म्हणाले, राज्यातील चारही कृषि विद्यापीठाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात दोन- तीन दिवसांत शासनाकडून महत्त्वाचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या इतर काही मागण्या असतील, तर त्यावर तोडगा काढण्यासंदर्भात लवकरच दरमहा ठराविक दिवशी जनता दरबारप्रमाणे "कर्मचारी दरबार' भरविण्याचे सुतोवाच त्यांनी केले. 

समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम म्हणाले, की कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू होणे महत्त्वाचे असून, वर्षानुवर्ष पदोन्नतीअभावी एकाच पदावर राहणाऱ्या वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना फायदा होईल. समन्वय संघाचे सरचिटणीस मच्छिंद्र बाचकर यांनी आभार मानले. समन्वय संघाचे गणेश मेहेत्रे, मच्छिंद्र बेल्हेकर, डॉ. संजय कोळसे, सुरेखा निमसे आदी उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision on the Seventh Pay Commission is likely to be taken in two days