शिर्डीत संस्थान अधिकाऱ्याचा हट्टयोग, ग्रामस्थांची बंदची हाक

सतीश वैजापूरकर
Wednesday, 27 January 2021

जाचक नियमावली करून साईदर्शन गुंतागुंतीचे करून काही साध्य होणार नाही. कारण कधी ना कधी नवे मंडळ अधिकारावर येईल. त्यात दोन चार तरी ग्रामस्थ असतील. ते सध्याची जाचक पध्दत मागे घेतील.

शिर्डी ः साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या स्वागतासाठी काल परवापर्यंत पुष्पगुच्छ घेऊन जाणारे ग्रामस्थ आता त्यांच्या विरोधात एकवटले आहेत. त्यांनी घेतलेल्या काही निर्णयात बदल केले नाहीत तर येत्या शनिवारी (ता.30) शिर्डी बंदची हाक देण्यात आली.

आपली भूमिका हटवादी नाही, ग्रामस्थांसोबत चर्चेची तयारी असल्याचे आज बगाटे यांनी जाहीर केले. मात्र आता दोन्ही बाजूंची स्थिती, एकदा जे वाटले, ते प्रेम आता आटले, अशी झाली आहे. 

भाविकांना बाहेर जाण्यासाठी तीन व चार क्रमांकाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने साईमंदिराच्या पुर्वेला व दक्षिणेला असलेली बाजारपेठ अक्षरशः ओस पडली. व्यापाऱ्यांत असंतोष खदखदतो आहे. हे दरवाजे भाविकांना बाहेर जाण्यासाठी खुले करावेत. ग्रामस्थांसाठी सुलभ साईदर्शन व्यवस्था करावी. भाविकांसोबतची लहान मुले व ज्येष्ठ मंडळींसाठी व्यवस्था करावी. या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी बंदचा इशारा दिला. 

बगाटे यांना आजच्या पत्रकार परिषदेत, सध्याची दर्शन व्यवस्था पूर्वीपेक्षाही उत्तम आहे. नट, नट्या, मंत्री, काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दर्शन व्यवस्थेची प्रशंसा केल्याचा दावा केला. मुळातच या मंडळींना दर्शन पास मिळविण्यासाठी रांगेत तिष्ठत उभे रहावे लागत नाही. त्यांना सगळेच उत्तम वाटत असते. 

हेही वाचा - वांबोरीत आरक्षणाने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची गोची, भाजप नेत्याला संधी

पूर्वी दिवसभरात लाखभर भाविक दर्शन घ्यायचे. आता कोविडमुळे ही संख्या दहा वीस हजारांवर आली. साहजिक निवांत दर्शन होते. त्यात नवल ते काय. मात्र गर्दीच्या काळात दर्शन पास मिळविताना सामान्य भाविकांची होणारी दमछाक आणि पासचा काळाबाजार याची जबाबदारी कुणी घ्यायची.

पंचक्रोशीतील पायी वारी करणाऱ्या भाविकांनी या त्रासापायी कळसाचे दर्शन घेण्याचा मार्ग पत्करला. त्यांची व्यथा कुणी जाणून घ्यायची. गर्दीच्या काळात सुलभ दर्शन व्यवस्था करता आली. भाविकांची दमछाक टाळता आली. तर त्यात खरे कौशल्य असते. गेल्या अडिच महिन्यात गर्दीच्या काळात असे चित्र एकदाही पहायला मिळाले नाही. 

अडीच महिन्यांची फुरसत असताना, केवळ उच्च न्यायालयाची परवानगी वेळेत मिळविता आली नाही केवळ या एकाच कारणास्तव यंदाची डायरी व दिनदर्शिका नव्या वर्षाचा पहिला महिना संपला तरी प्रदर्शित झाली नाही. साईसंस्थानच्या दोन्ही रूग्णालयात रूग्णांची हेळसांड होते. डॉक्‍टर मंडळी सोडून चालली आहेत. कधी औषधांचा तुटवडा तर कधी डॉक्‍टर भेटतील याची शाश्वती नाही. त्याकडे कुणी पहायचे. जवळपास प्रत्येक विभागात खूप काही करण्या सारखे आहे. 

पूर्वी शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांना साईमंदिरात जाण्यासाठी गावकरी दरवाजा होता. कोविडमुळे तो बंद करावा लागला हे समजण्यासारखे आहे. मात्र, जाचक नियमावली करून साईदर्शन गुंतागुंतीचे करून काही साध्य होणार नाही. कारण कधी ना कधी नवे मंडळ अधिकारावर येईल. त्यात दोन चार तरी ग्रामस्थ असतील. ते सध्याची जाचक पध्दत मागे घेतील. 

सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या बैठकीस साईसंस्थानचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, शिवसेनेचे कमलाकर कोते, संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश गोंदकर, संदीप सोनावणे यांच्यासह व्यापारी मंडळीदेखील उपस्थीत होते. 

 
ग्रामस्थांनी समिती नेमून साईदर्शन व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करावे. भाविकांना बाहेर पडण्यासाठी अन्य दरवाजे खुले करण्याची आपली तयारी आहे. ऑनलाईन पास मिळविण्याबाबतच्या त्रुटी दूर केल्या जातील. कोविड मुळे दर्शन व्यवस्थेत बदल झाले. त्यामुळे निर्माण झालेला असंतोष समजू शकतो. मी संवेदशनशीलतेने याकडे पहातो. 

- कान्हूराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईसंस्थान, शिर्डी. 

 
विनाकारण संघर्ष किंवा आंदोलन करण्याची ग्रामस्थांची मानसिकता नाही. चर्चेने प्रश्न सुटला तर चांगले होईल. साईमंदिर परिसरात आले की मंत्रालयात आल्या सारखे वाटते. ग्रामस्थांवर अशी वेळ कधीच आली नव्हती. पंचक्रोशीतील भाविक देखील फार नाराज आहेत. कोविडच्या नावाखाली साईदर्शन अवघड करण्यात आले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांना आम्ही साकडे घालू. शेवटचा पर्याय म्हणून आंदोलन हाती घेऊ. 
- अभय शेळके,माजी उपनगराध्यक्ष, शिर्डी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The decision of the villagers to keep Shirdi closed due to Darshan