esakal | अजबच! हे गाव करतं दैत्याची पूजा; हनुमंताचं मंदिर नाही, नाव घेतलं तरी घडतं असं...
sakal

बोलून बातमी शोधा

The demon is worshiped in Nimbadaitya village

गावात हनुमंताचं नाव घेता येत नाही. जाणीवपूर्वक एखाद्याने घेतलंच तर त्याला विचित्र अनुभव येतो. या मुलखावेगळ्या गावाचं नाव आहे निंबादैत्य नांदूर. नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगेत ते वसले आहे. पूर्वी हा भाग दंडकारण्य म्हणून परिचित होता.

अजबच! हे गाव करतं दैत्याची पूजा; हनुमंताचं मंदिर नाही, नाव घेतलं तरी घडतं असं...

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः महाराष्ट्रात अनेक गावं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही ठिकाणच्या प्रथा तर हसायला लावतात. काही गावातील जत्रा-यात्राही कमालीच्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आजच्या वैज्ञानिक युगातही प्रथा परंपरा जपल्या जातात. त्याला कारणंही तशीच आहेत.

देशभरात देवी-देवतांची मंदिरे आहेत. त्यांची पूजा-अर्चा केली जाते. दैत्य आणि देव यांचे शत्रुत्त्व होते. त्याचे पुराणात दाखले सापडतात. दैत्य, दानव, राक्षस यांना क्रूर समजले जाते. वास्तवात ते तसे होते की नाही हा संशोधनाचा विषय आहे. काही अभ्यासकांचे तसे शोधनिबंधही प्रसिद्ध आहेत. ते काहीही असलं तरी नगर जिल्ह्यात एक गाव असं आहे की जिथं होते दैत्याची पूजा. आणि विशेष म्हणजे त्या दैत्याचे मंदिरही आहे. संबंधित गावालाही त्याच नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे हा दैत्य नवसालाही पावतो. आणि त्याची चांगला तीन दिवस यात्रोत्सवही असतो. 

गावात हनुमंताचं नाव घेतलं की होतं असं...

महाराष्ट्रात आपल्याला हनुमानाचं मंदिर नाही असं एकही गाव सापडायचं नाही. परंतु हे गाव त्याला अपवाद आहे. गावात हनुमंताचं नाव घेता येत नाही. जाणीवपूर्वक एखाद्याने घेतलंच तर त्याला विचित्र अनुभव येतो. या मुलखावेगळ्या गावाचं नाव आहे निंबादैत्य नांदूर. नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगेत ते वसले आहे. पूर्वी हा भाग दंडकारण्य म्हणून परिचित होता. पुराणातही त्याचा उल्लेख येतो. प्रसिद्ध असलेल्या भगवान गडापासून हे गाव हाकेच्या अंतरावर आहे.

अशी आहे अख्यायिका

या निंबादैत्य नांदूर गावाचा रामायण काळाशी संदर्भ असल्याचे सांगितले जाते. माता सीतेला रावणाच्या तावडीतून प्रभू श्रीराम सोडवून आणतात. परंतु काही कारणाने सीतेला पुन्हा जंगलातून सोडून दिले जाते. ही जबाबदारी हनुमंतावर सोपवली जाते. हनुमंत माता सीतेला दंडकारण्यात सोडण्यासाठी जातात. हे ठिकाण म्हणजे काशी केदारेश्वर. हे ठिकाण पाथर्डी तालुक्यात अाहे.

सीतामाईला जंगलात सोडल्यानंतर हनुमंत तिच्यासाठी फळं शोधत असतो. एका ठिकाणी त्याला भरपूर फळं दिसतात. तो ती फळं तोडतो. हे निंबादैत्याच्या लक्षात येतं. आपली परवानगी न घेता,हा कोण आपल्या राज्यातील संपत्ती चोरतो आहे, याचा त्याला राग येतो. त्यामुळे निंबादैत्य हा हनुमंताला युद्धासाठी ललकारतो. हनुमंतही गदा घेऊन निंबादैत्यावर चालून येतो. त्या दोघांत घनघोर असे गदा युद्ध होते. त्यात दोघही जखमी होतात. जखमी झाल्यानंतर निंबादैत्य प्रभूरामाचा धावा करतो. त्यामुळे हनुमंत आश्चर्यचकीत होतो. प्रभूराम येतात आणि निंबादैत्याला बरे करतात आणि वर देतात. या गावात तुझेच नाव निघेल. तुझे मंदिरही बांधले जाईल.

रामाने वर दिल्यानंतर निंबादैत्य सांगतात, तुम्ही तर हनुमंताला प्रत्येक गावात तुझे मंदिर होईल, असे सांगितले आहे. मग हे कसे. त्यावर प्रभू राम म्हणतात, हे गाव तुझेच. इथे हनुमंताचे मंदिर नसेल आणि त्याच्या नावाचा उल्लेखही निघणार नाही.

मुलाचंही नाव कोणी मारूती, हनुमान ठेवीत नाही

दैनिक सकाळचे नेवासे तालुका प्रतिनिधी सुनील गर्जे याच गावातील आहेत. त्यांनी दिलेले दाखले आश्चर्यकारक आहेत. ते म्हणतात, दैत्य नांदूर हे गाव रामायण काळातील ही प्रथा आजही पाळते आहे. गावातील कोणतीच व्यक्ती आपल्या मुलाचे नाव मारूती, हनुमान, पवन ठेवीत नाही. या गावात ७५ टक्के लोक शिक्षक आहेत. ते चांद्यापासून बांधापर्यंतच्या शाळांत अध्यापन करतात. परंतु पाडव्याला निंबादैत्याच्या यात्रेला येतातच. इथला भूमिपूत्र अमेरिकेत असला तरी त्याच्या घरात निंबादैत्याचे छायाचित्र असतेच.

असे घडले आहेत चमत्कार

गावात श्री निंबादैत्याच्या नावाने सार्वजनिक ट्र्स्ट आहे. त्याचे डॉ. सुभाष देशमुख हे अध्यक्ष आहेत. या ट्रस्टने गावासाठी मोठे काम केले आहे. देशमुख यांनी सांगितलेले अनुभव मजेशीर आहेत. त्यांनी श्री निंबादैत्याला अभिषेक करून विशिष्ट कंपनीची गाडी घेतली. हनुमानाच्या नावाशी साधर्म्य असलेली ती गाडी होती. त्या नावावर डॉक्टरांनी स्टिकर लावले होते. परंतु महिन्यातच त्यांना ती गाडी विकावी लागली.

डोंबारी पडला दोरीवरून

डोंबारी हे कसरती करायला पटाईत असतात. दोन वर्षांपूर्वी गावात एक डोंबारी आला होता. तो कसरती करून झाल्यावर जय बजरंग किंवा बजरंग बली की जय असा जयघोष करायचा. लोकांनी त्याला गावची परंपरा सांगितली. परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळातच तो दोरीवरून पडून बेशुद्ध झाला. मग त्याला निंबादैत्याच्या मंदिरात नेलं. मग तो शुद्धीवर आला.

दुसरा किस्सा तर अजबच आहे. परगावचे लोक मुद्दाम ती गाडी घेऊन आले. जाताना त्यांना ती चालूच होईना. शिवेच्या बाहेर गेल्यावर ती चालू झाली. गावात येणारा नवरदेवही हनुमान, मारूती, पवन नावाचा नसतो. असला तरी त्याचे नाव बदलले जाते. एक बाळ सारखे रडायचे. दवाखाने करून झाले तरी उपयोग होत नव्हता. मग शोध घेतल्यावर लक्षात आलं की त्याच्या खाली जे अंथरून आहे, त्यावर मारूतीचे चित्र होतं.

आजच्या विज्ञान युगात या भाकडकथा वाटत असल्या तरी ही वस्तुस्थिती आहे. भले ही अंधश्रद्धा वाटत असली तरी निंबादैत्य नांदूरच्या गावकऱ्यांसाठी श्रद्धा आहे. ती त्यांनी मनोभावे जपली आहे.